नवीन अधिकाऱ्यांची पावसाळ्यामध्ये कसोटी; पालिकेचे अनुभवी अधिकारी, अभियंते निवृत्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 09:40 AM2024-07-01T09:40:17+5:302024-07-01T09:41:43+5:30
मुंबई शहर व उपनगरातील सुमारे सव्वा कोटी नागरिकांना १२९ विभागांद्वारे विविध सेवा पालिकेतर्फे पुरवल्या जातात.
मुंबई : पावसाळा आली की मुंबई पालिका प्रशासनाला अधिक दक्ष राहावे लागते. रस्त्यांची कामे, खड्डे, ठिकठिकाणी साचणारे पाणी, साथीचे आजार तसेच मुंबईला होणारा पाणीपुरवठा, पावसाळ्यातील पुलांची स्थिती यांसारख्या अनेक बाबींवर लक्ष ठेवून सातत्याने त्याचा आढावा घ्यावा लागतो. अशा परिस्थितीत पालिकेचे विविध प्रकल्प आणि अभियांत्रिकी कामांमधील अनुभवी अभियंत्यांची फळीच ३० जूनला निवृत्त झाली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी येणारे अभियंते आणि अधिकारी यांच्यासाठी यंदाचा पावसाळा आव्हानात्मक असणार आहे, अशी चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली आहे.
मुंबई शहर व उपनगरातील सुमारे सव्वा कोटी नागरिकांना १२९ विभागांद्वारे विविध सेवा पालिकेतर्फे पुरवल्या जातात. त्यातही पावसाळा म्हटला की पालिकेच्या सर्वच विभागांना अलर्ट मोडवर राहावे लागते. अनुभवी अधिकारी व अभियंत्यांचा या काळात कस लागतो. मात्र, यंदा ३० जूनला अभियांत्रिकी, अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प, रस्ते आदी विभागांतील अभियंते निवृत्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी प्रशासनाने इतर अभियंते आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून, त्यांची पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थितीचा सामना करताना कसोटी लागणार आहे.
साहायक आयुक्त पदांसाठी मागवले अर्ज -
१) पालिकेतील साहायक आयुक्त पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी प्रशासनाने कार्यकारी अभियंता व उपप्रमुख अभियंता पदावरील अधिकाऱ्यांकडून अर्ज मागवले आहेत. पालिकेच्या साहायक आयुक्तांची नियुक्ती लोकसेवा आयोगामार्फत केली जाते.
२) पालिकेची २४ विभागीय कार्यालये तसेच कर निर्धारण व संकलन, नियोजन या विभागांचे प्रमुख साहायक आयुक्त असतात. काही वर्षांत साहायक आयुक्तांच्या ५० टक्के जागा रिक्त आहेत. ३५ पदांपैकी केवळ १७ पदे भरलेली आहेत. उर्वरित १८ पैकी ११ पदांवर कार्यकारी अथवा उपप्रमुख अभियंत्यांना अतिरिक्त पदभार दिला आहे.
३) सध्या साहायक आयुक्त असलेले काही जण उपायुक्त पदासाठी पात्र ठरले आहेत. मात्र साहायक आयुक्त पदासाठी उमेदवार मिळत नसल्यामुळे त्यांची बढती रखडली आहे. तर, काही अधिकारी उपायुक्त व साहायक आयुक्त पदांचा भार सांभाळत आहेत.