मुंबई : ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी गायमुख ते भाईंदर असा १५.५ किलोमीटर लांबीचा नवीन रस्ता उभारला जाणार आहे. यात ३.५ किलोमीटरचा भुयारी मार्ग असेल. या मार्गामुळे ठाणे ते मीरा-भाईंदर हा प्रवास जलद होणार आहे.
मीरा-भाईंदर येथून ठाण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. गुजरात आणि उत्तर भारतातून येणारी अवजड वाहने या रस्त्यावर दाखल होत असल्याने कोंडीत भर पडते. त्यामुळे घोडबंदर फाउंटन ते घोडबंदर रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे.
विशेषत: फाउंटन चौकात आणि गायमुख भागात मोठी कोंडी होते. काही किलोमीटर अंतराच्या प्रवासासाठी वाहनांना तासनतास कोंडीत अडकून पडावे लागते.
दरम्यान, हा भाग पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असल्याने तिथे अस्तित्वातील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात अडचण आहे. यावर तोडगा काढण्यासाठी गायमुख ते फाउंटन भुयारी मार्ग उभारला जाणार आहे. त्यापुढे भाईंदरपर्यंत उन्नत मार्ग उभारण्याचा निर्णय ‘एमएमआरडीए’ने घेतला आहे. हा रस्ता तयार झाल्यावर वाहतूक कोंडीतून वाहनचालक आणि प्रवाशांची सुटका होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
२० हजार कोटींच्या प्रकल्पाला मान्यता-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत २० हजार कोटींच्या या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार गायमुख ते फाउंटन असा भुयारी मार्ग आणि पुढे फाउंटन ते भाईंदर असा उन्नत मार्ग उभारला जाणार आहे. यातील गायमुख ते फाउंटन मार्गासाठी ११ हजार ५०० कोटींचा, तर फाउंटन ते भाईंदर उन्नत मार्गासाठी ८ हजार ५०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
प्रवासासाठी दोन पर्याय-
सद्यस्थितीत ‘एमएमआरडीए’ने ठाणे-बोरीवली भुयारी मार्गाचे काम हाती घेतले आहे. लवकर या मार्गाच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे पश्चिम उपनगर आणि मीरा-भाईंदर येथील रहिवाशांना ठाण्याकडे जाण्यासाठी दोन नवे पर्याय उपलब्ध होणार आहेत. तसेच वसई-विरार भागातील नागरिकांनाही ठाण्याकडे जाणार सुखकर होणार आहे.
१) गायमुख ते फाउंटन असा ५.५ किलोमीटर लांबीचा रस्ता असेल.
२) यातील ३.५ किमी लांबीचा भुयारी मार्ग उभारला जाईल.
३) दोन्ही दिशेच्या वाहतुकीसाठी तीन मार्गिकांचे दोन स्वतंत्र बोगदे उभारले जातील. तर, यात सुमारे २ किलोमीटर लांबीचा उन्नत रस्ता असेल.