गोंधळ घातलात, तर तडीपारीची कारवाई; पोलिसांकडून दिवसाआड तडीपार आरोपीवर बडगा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 10:21 AM2024-07-29T10:21:13+5:302024-07-29T10:23:26+5:30
सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांकडून वेळोवेळी आरोपींना तडीपार केले जाते.
मुंबई : सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांकडून वेळोवेळी आरोपींना तडीपार केले जाते. असे असतानाही काही तडीपार आरोपींकडून परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांकडून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात येते. तडीपार आरोपींविरोधातील कारवाईसाठी पोलिसांकडून गस्तीवर भर देण्यात आला आहे. तसेच तुम्हालाही तडीपार आरोपी दिसल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे.
मुंबई पोलिसांकडून महिनाअखेरीस ‘ऑल आउट’ ऑपरेशन हाती घेतले जाते. त्यात शहरात एकाच वेळी २०० हून अधिक ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवून ते आरोपींची धरपकड करतात. अवैध व्यवसायांवरही टाच आणली जात आहे. अनेकदा फरार आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांकडून हनी ट्रॅपचा आधार घेतला जात आहे. तसेच, वेगवेगळ्या भूमिका साकारत पोलिस फरार आरोपींपर्यंत पोहोचतात. गेल्या चार वर्षांत मुंबई पोलिसांनी हजारांहून अधिक फरार, तडीपार आरोपींना अटक केली आहे. तसेच दिवसाआड एका तडीपार आरोपीविरोधात पोलिसांकडून कारवाई होताना दिसत आहे.
हद्दपार आरोपी बनला पोलीस अधिकारी-
यापूर्वी गिरगावात कामानिमित्त आलेल्या एका व्यावसायिक तरुणाला पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करत लुबाडणाऱ्या अभिलेखावरील हद्दपार आरोपीला डाॅ. दा. भ. मार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अजयकुमार हरीजन (३०) असे या आरोपीचे नाव आहे.
एका क्लिकवर गुन्हेगारांची कुंडली-
मुंबई पोलिसांची ॲम्बिस प्रणाली गुगल प्रमाणे काम करत आहेत. एका क्लिकवर गुन्हेगारांची सर्व कुंडली त्यातून उपलब्ध होत आहे. एकाचवेळी साडेसहा लाख गुन्हेगारांचे तपशील ही यंत्रणा उपलब्ध करून देत आहे.
इतकेच नव्हे तर छायाचित्रांवरून किंवा सीसीटीव्हींनी कैद केलेल्या फुटेजवरूनही गुन्हेगारांची ओळख पटत आहे. तसेच आरोपींची इत्यंभूत माहितीही पोलिसांना मिळत आहे. महाराष्ट्र सायबरने पुढाकार घेत ही अद्ययावत प्रणाली विकसित केली. मुंबईतून याची सुरुवात करण्यात आली आहे.
पोलिसावरच हल्ला-
हद्दपार आरोपीवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसावर हल्ला करण्यात आल्याची घटना वांद्रे येथे घडली आहे. याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आसिफ अब्दुल गफ्फार शेख ऊर्फ टेरेस (२२) असे अटक आरोपीचे नाव असून, तो अभिलेखावरील आरोपी आहे. आसिफला दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले. त्याच्याविरोधात चोरीच्या गुन्ह्यांचीही नोंद आहे.