Join us

केबल, पाइपलाइन टाकली की पालिकाच बुजविणार खड्डे; वरवरच्या मलमपट्टीचा भूर्दंड वाचणार

By सीमा महांगडे | Published: February 22, 2024 9:57 AM

२८० कोटींची तरतूद.

सीमा महांगडे,मुंबई : महापालिकेची प्रत्येक कंत्राटे ही कोटींच्या कोटी उड्डाणे घेणारी असतात. नालेसफाई, खड्डे बुजवण्यासाठी ५० ते १०० कोटी रुपये खर्च केले जातात. त्या तुलनेत रस्त्यावरील चर बुजवण्याचा खर्च मात्र अफाट आहे. त्यामुळे चर पुनर्भरणीचे काम करताना संबंधित कामाचा दर्जा व गुणवत्ता राखावी, अशा सूचना पालिकेच्या रस्ते व वाहतूक विभागाकडून देण्यात आल्या आहेत. 

या पार्श्वभूमीवर चर पुनर्भरणीच्या कामाची गुणवत्ता व दर्जा राखण्यासाठी गुणवत्ता व्यवस्थापन संस्था नेमण्याच्या सूचना पालिकेकडून करण्यात आल्या आहेत. यामुळे रस्त्यांवर चर भरण्याच्या कामात त्रुटी निर्माण होणार नाहीत आणि अशा रस्त्यांच्या परीक्षणावर खर्चही होणार नाही. परिणामी, मुंबईकरांसाठी चांगले रस्ते उपलब्ध होतील, अशी अपेक्षा केली जात आहे. 

पुढील वर्षभरासाठी पालिकेकडून चर बुजवण्यासाठी केबल टाकणे, जल वाहिन्या टाकणे, अशा विविध कामांसाठी रस्त्यांवर खोदण्यात आलेले चर बुजवण्याचे मुंबई महापालिका हाती घेणार आहे. शहर व दोन्ही उपनगरांतील चर बुजवण्यासाठी महापालिका २८० कोटी रुपये खर्च करणार असून, कामासाठी आयुक्तांकडून प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. पालिका चर बुजवण्यासाठी संबंधित कंपन्यांकडून शुल्क आकारते. अनेक कंपन्या केवळ वरवरची मलमपट्टी करत असल्याने पालिकेला हे चर पुन्हा बुजवावे लागण्याचा भुर्दंड पडू लागला. त्यामुळे कंपन्यांकडून शुल्क आकारून आता पालिका स्वतः कंत्राटदारांकडून चर बुजवण्याचे काम करून घेते आहे.

१) ८०% कंत्राटदारांना प्रशासन काम पूर्ण होईपर्यंत रकमेच्या ८० टक्के रक्कम देणार असून, रक्कम ही तीन वर्षांच्या काळात देणार आहे.

२) ६% काम पूर्ण झाल्यानंतर एका वर्षाने त्या रस्त्याच्या खडबडीतपणाच्या निर्देशकांची चाचणी चांगली आल्यास ६ टक्के रक्कम देण्यात येईल.

३) ६% दोन वर्षांनंतर कामाच्या खडबडीतपणाच्या निर्देशकांची चाचणी समाधानपूर्वक आल्यास सहा टक्के रक्कम देण्यात येईल.

४) ८% तीन वर्षांनंतर कामाच्या खडबडीतपणाच्या निर्देशकांची चाचणी समाधानपूर्वक आल्यास आठ टक्के रक्कम देण्यात येईल.

परिमंडळनिहाय निविदा :

पालिकेच्या हद्दीतील सात परिमंडळनिहाय निविदा मागवण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी या कामासाठी प्रशासकीय अधिकारात आयुक्तांनी ३८३ कोटींच्या कंत्राटास मंजुरी दिली होती. रस्त्यांवरील चर पुनर्भरणी कामांचा भाग म्हणून यंदा परिमंडळनिहाय प्रत्येकी ४० कोटी, असे एकूण २८० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

चर बुजविणे आवश्यक का?  

मुंबईत विविध प्राधिकरणांची कामे सुरू असून, विविध प्राधिकरणांच्या माध्यमातून रस्त्याखाली केबल टाकणे, मोबाइलचे केबल नेटवर्कचे जाळे विस्तारणे, जल वाहिन्या, मलनिस्सारण वाहिन्या टाकणे, यासाठी चर खोदले जातात. 

खासगी कंपन्या, सरकारी यंत्रणांकडून केल्या जाणाऱ्या या कामांसाठी पालिका संबंधितांकडून पैसे आकारते. कामानंतर रस्त्यावर चर तसेच ठेवले जात असल्याने नागरिकांना त्याचा त्रास होतो. विशेषत: पावसाळ्याच्या तोंडावर केल्या जाणाऱ्या कामांमुळे पाणी साचण्याचे प्रकार घडतात.

टॅग्स :मुंबईनगर पालिका