Join us  

बाणगंगा तलावाच्या कंत्राटदारावर गुन्हा, पायऱ्यांची केली नासधूस; पालिकेकडून डागडुजी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 9:53 AM

बाणगंगा ही पुरातन वास्तू असून पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या निर्देशानुसार मुंबई पालिकेने बाणगंगा तलाव व परिसर पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतला आहे.

मुंबई : ऐतिहासिक बाणगंगा तलाव व परिसर पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत कामे करताना तलावाच्या उत्तर प्रवेशद्वारावरून आतमध्ये एक्सकॅव्हेटर मशिन उतरवून तलावांच्या पायऱ्यांचे नुकसान केल्याबद्दल मुंबई पालिकेने कंत्राटदार मे. सवानी हेरिटेज कन्झर्वेशन प्रायव्हेट लिमिटेडला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच तलावास हानी पोहोचवून नुकसान केल्याबद्दल मलबार हिल पोलीस ठाण्यात एफआयआरही दाखल केली आहे. दरम्यान, नुकसान झालेल्या पायऱ्यांची डागडुजी पालिकेने केली आहे.

बाणगंगा ही पुरातन वास्तू असून पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या निर्देशानुसार मुंबई पालिकेने बाणगंगा तलाव व परिसर पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतला आहे. पालिकेने विशेष प्राधान्य प्रकल्प म्हणून त्याची घोषणा करत निविदा प्रक्रिया राबविली. त्यानंतर कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली. पुनरुज्जीवन प्रकल्पाचा एक भाग म्हणून मुंबई पालिकेने आतापर्यंत तलावाच्या बाजूची सर्व बांधकामे हटवली आहेत. तसेच दीपस्तंभांची डागडुजी केली आहे. शिवाय प्रकल्पाचा भाग म्हणून तलावातील गाळ काढण्यासाठी कंत्राटदाराकडून एक्सकॅव्हेटरमशिन तलावाच्या उत्तर दिशेच्या प्रवेशद्वाराने उत्तरवले. या बाबतची माहिती मिळताच पालिकेच्या 'डी' विभाग कार्यालयाने काम थांबविले आणि मशिन बाहेर काढले आहे.

मंगलप्रभात लोढा यांनी मंगळवारी बाणगंगा तलावाला भेट देत नुकसान झालेल्या पायऱ्यांची पाहणी केली.यावेळी पायऱ्यांची तातडीने डागडुजी करण्याचे निर्देश लोढा यांनी दिले. पालिकेने त्या पायऱ्या व काढून ठेवलेले दगड यांची पुनर्स्थापना करण्याचे काम पूर्ण केले. उर्वरित कामेही येत्या काळात केली जाणार आहेत.

भविष्यात अशी कोणतीही घटना घडू नये, यासाठी स्थानिकांची एक कमिटीही स्थापन करण्यात येणार आहे. ही कमिटी पुढे होणाऱ्या कामकाजावर देखरेख ठेवेल. संपूर्ण घटनेची तपासणी करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांची कमिटी स्थापन केली जाणार असून, ती पुढील १५ दिवसांत अहवाल सादर करेल.- मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री, पुनरुज्जीवन प्रकल्प

अंतर्गत सुरु असलेली कामे-

१) बाणगंगा तलावातील दगडी पायऱ्यांची सुधारणा

२) तलाव परिसरातील दीपस्तंभांची डागडुजी करणे. 

३) तलावामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करणे.

४) तलावाच्या दगडी पायऱ्यांवरील अतिक्रमण हटविणे.

५)  रामकुंडाचे पुनरुज्जीवन करणे,

६) बाणगंगा परिसरातील मंदिरांचा सर्वंकष विकास आराखडा तयार करणे व योजनाबद्ध पद्धतीने रूपरेषा ठरविणे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामंगलप्रभात लोढा