नाहूरमध्ये ऐकू येणार विदेशी पक्ष्यांचा किलबिलाट; जगभरातील विविध खंडांतून आणणार पक्षी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 10:12 AM2024-08-21T10:12:51+5:302024-08-21T10:15:37+5:30
नाहूरमध्ये पक्षी संग्रहालय उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : नाहूरमध्ये पक्षी संग्रहालय उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आगामी काळात या परिसरात विदेशी पक्ष्यांचा किलबिलाट कानावर पडेल.
नाहूरमधील मौजे नाहूर हा भूखंड उद्यानासाठी आरक्षित होता. या जागेवर पक्षी संग्रहालय बांधण्याची मागणी होत होती. मुंबई पालिकेने या मागणीची दखल घेतली असून आरक्षण बदलण्याचा प्रस्ताव पुढील प्रक्रियेसाठी नगरविकास खात्याकडे पाठवला आहे. पक्षीगृह बांधण्यात येत असलेल्या आरक्षित जागेचे क्षेत्रफळ हे १७ हजार ९५८ चौरस मीटर एवढे असून ही जागा पालिकेच्या मालकीची आहे. या पक्षीगृहात नागरिकांसाठी जॉगिंग पार्क तसेच खुली व्यायामशाळा व अन्य सुविधा असतील.
अभ्यासकांना फायदा-
१) भायखळा येथील वीर जिजामाता उद्यान आणि प्राणी संग्रहालयात विविध प्रजातींच्या पक्ष्यांचे पिंजरे आहेत. त्यात देशी आणि विदेशी असे दोन्ही प्रकारचे पक्षी आहेत.
२) नाहूर येथील पक्षी संग्रहालयात फक्त विदेशी प्रजातीचे पक्षी असतील. त्यामुळे विशेष करून पक्षांचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना या संग्रहालयाचा फायदा होईल.
३) उपनगरातील नागरिकांना पक्षी पाहण्यासाठी थेट भायखळ्यापर्यंत जाण्याची गरज राहणार नाही. जगाच्या विविध खंडातून या ठिकाणी पक्षी आणले जातील. भारतीय हवामान सहन करण्याची क्षमता असलेलेच पक्षी आणले जातील, असे पालिकेकडून सांगण्यात आले.