मुंबई : रस्त्यांवरील खड्यांमुळे मुंबईच्या बहुसंख्य भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. काही ठिकाणी खड्डे भरण्याची कामे सुरू आहेत; मात्र पावसाने भरलेले खड्डे पुन्हा उखडण्याचे प्रकार घडत आहेत. तर काही ठिकाणी खड्यांकडे पालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. शिवडी काळाचौकीतील लोक खड्ड्यांमुळे कातावले असून खड्डे लवकर न भरल्यास आंदोलन करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
शिवडी काळाचौकीतील प्रभाग क्रमांक २०६ मधील नागरिकांसाठी प्रमुख रहदारीचा रस्ता समजला जाणाऱ्या टी.जे. रोडच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम साधारण दीड वर्षापूर्वी मंजूर झाल्यानंतर या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. पी. जी. सावंत चौक वाडिया गोडाउन येथे काही प्रमाणात काम करण्यात आले. त्यानंतर संबंधित ठेकेदाराने काम बंद केले. आजतागायत काम पुन्हा सुरू झालेले नाही. आता तर पावसाळ्यात या संपूर्ण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
काँक्रिटीकरण करा'-
१) या प्रकरणी मुंबई महापालिका रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता निकम यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
२) या रस्त्याचे सिमेंट कॉक्रिटीकरण करण्याचे काम चालू करावे. जोपर्यंत काम सुरू होत नाहीं तोपर्यंत सर्व खड्डे तातडीने बुजवण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली. त्यावर लवकरच या रस्त्यावरील खड्डे बुजवले जातील असे आश्वासन देण्यात आले.
३) याची पूर्तता न झाल्यास स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन केले जाईल, असा इशारा ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सचिन पडवळ आणि पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.