मुंबई : बँकेत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याने तीन लाख १८ हजारांच्या खराब नोटा चोरल्या. हा गुन्हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे उघडकीस आला. याप्रकरणी बँकेच्या व्यवस्थापकाने दिलेल्या तक्रारीनुसार वांद्रे पोलिसांनी हर्षद रावराणे (२२) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार अरुणकुमार वर्मा (३७) हे पंजाब नॅशनल बँकेच्या वांद्रे पश्चिम शाखेमध्ये व्यवस्थापकपदी कार्यरत आहेत. बँकेत आरबीआयकडून आलेली रक्कम ते इतर बँक शाखांना पुरवतात. तसेच त्यांच्या इतर बँकेच्या शाखांकडून आलेल्या रकमेपैकी खराब नोटा व चांगल्या नोटा वेगळ्या काढल्या जातात.
गेल्या वर्षभरात १३ जुलै रोजी २६० कोटी, तर ६ सप्टेंबरला १५० कोटी आणि १२ ऑक्टोबरला ८७.३० कोटी, असे एकूण ९२.८६६ कोटी रुपयांच्या खराब नोटा त्यांनी ‘आरबीआय’च्या फोर्ट येथील शाखेत पाठवल्या. मात्र, त्यात दोन लाख ९६ हजार ५०० रुपये कमी असल्याचा ई-मेल ‘आरबीआय’ने बँकेला केला. त्यानंतर आरबीआय अधिकाऱ्यांनी ३१ ऑक्टोबर २०२३ ते २ नोव्हेंबर २०२३ पर्यंत वांद्रे बँक शाखेत येऊन रोख रकमेची तपासणी केली असता त्यातही २२ हजार रुपये कमी आढळले. अशा प्रकारे एकूण तीन लाख २८ हजार ५०० रुपयांची तफावत आढळली. वर्मा यांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता बँकेमध्ये पार्टटाइम काम करणारा सफाई कर्मचारी रावराणे हा खराब नोटांची पॅकिंग सुरू असताना त्या चोरत असल्याचे दिसून आले.