मुंबई : शहरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या कोस्टल रोडच्या बोगद्यात आता इंटरनेट सेवा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मोबाइलची अखंडित सेवा वापरता येणार आहे. प्रवासाच्या दरम्यान संपर्क कायम राहावा, या दृष्टिकोनातून महापालिकेतर्फे नियोजन करण्यात येत आहे.
बोगद्यात अनेकदा इंटरनेट सुविधा खंडित होते. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांना इतरांशी संपर्क साधता येत नाही. पालिकेने हजारो कोटी रुपये खर्च करून कोस्टल रोड बांधला असला, तरी बोगद्यातही इंटरनेटचा अभाव आहे. ही त्रुटी दूर करण्यासाठी प्रकल्पाच्या दोन्ही बोगद्यांमध्ये लवकरच इंटरनेट सेवा कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वसाधारण मोबाइल आणि इंटरनेट अशा दोन्ही प्रकारे बोगद्यांतून वाहन चालकांचा संपर्क होणार आहे. २० मेपर्यंत ही सेवा कार्यान्वित करण्याचे पालिकेचे प्रयत्न आहेत. बोगद्यांमध्ये खासगी कंपनीच्या माध्यमातून इंटरनेट सेवा कार्यान्वित करण्याचे काम सुरू केले आहे.
एक लाख रुपये प्रतिमहिना भाडे-
१) दूरसंचार विभागाच्या (डीओटी) अंतर्गत येणाऱ्या विभागाने पालिकेला पत्र लिहून सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडियाकडून प्रकल्पाच्या बोगद्यात वाहन चालकांचा मोबाइल संपर्क होत नसल्याचे कळविले आहे.
२) ‘डीओटी’ने पालिकेला परवानगी दिली आहे. इंटरनेट सेवेचे कंत्राट ओएसआर टेलिसर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडला दिले असून प्रति महिना एक लाख सहा हजार रुपये भाडे देणार आहे. पहिल्या वर्षाचे पैसे देण्यात आले आहेत.
३) सर्व कंपन्यांच्या मोबाइल धारकांना संपर्क शक्य होणार आहे. बोगद्याच्या बाहेर या इंटरनेट सेवेसाठी सबस्टेशन बांधले जाणार असून त्यास बेस्टतर्फे वीजपुरवठा केला जाणार आहे.