सफाई कामगार वसाहत पुनर्विकासाचा खर्च वाढला; ९७ कोटींवरून १२० कोटींवर गेला प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 11:29 AM2024-08-02T11:29:25+5:302024-08-02T11:30:09+5:30
पालिकेतील सफाई कामगारांच्या वसाहतींच्या पुनर्विकासापैकी पश्चिम उपनगरांतील तीन वसाहतींचा खर्च ९७ कोटींवरून १२० कोटींवर गेला आहे.
मुंबई : पालिकेतील सफाई कामगारांच्या वसाहतींच्या पुनर्विकासापैकी पश्चिम उपनगरांतील तीन वसाहतींचा खर्च ९७ कोटींवरून १२० कोटींवर गेला आहे. मालाड, कांदिवली, बोरिवली येथील वसाहतींच्या पुनर्विकास खर्चात वाढ झाली आहे.
पालिकेच्या एकूण ४६ वसाहती असून त्यामध्ये एकूण २९,६१८ सफाई कामगारांपैकी ५५९२ सफाई कामगारांना सेवानिवास्थाने देण्यात आली आहेत. या वसाहतींमधील घरे १५० चौ. फुटाची असल्याने ती अपुरी पडतात. त्यामुळे पालिकेने आश्रय योजनेअंतर्गत या वसाहतींचा पुनर्विकास करण्याचे ठरवले आहे. मुंबईतील ४६ वसाहतींपैकी शहरात २०, पश्चिम उपनगरात ११ व पूर्व उपनगरात ८ अशा ३९ वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येत आहे. त्याबाबतचे प्रस्तावही दोन वर्षांपूर्वी स्थायी समितीमध्ये मंजूर झाले आहेत. मात्र, आता प्रस्तावाचा खर्च वाढला आहे. मालाड परिसरातील जे. पी. नगर, कांदिवलीतील आकुर्ली रोड आणि बोरिवलीती बाभई नाका वसाहतींच्या पुनर्विकासाचा खर्च वाढला आहे.
वास्तुशास्त्रज्ञांनी बांधकामक्षेत्र वाढविले-
१) बांधकाम क्षेत्र वाढल्यामुळे बांधकामाच्या खर्चात वाढ झाल्याचे सांगण्यात आले. असल्याचे कारण प्रशासनाने दिले आहे.
२) सुरुवातीला या प्रकल्पासाठी अंदाजित बांधकाम क्षेत्रफळ २१ हजार ६७६.१३ चौ. मीटर ठरवले होते. त्यावेळी त्याचा खर्च ९७ कोटी अंदाजित केला होता.
३) वास्तुशास्त्रज्ञांनी बांधकामक्षेत्र २९ हजार ७६३ चौ. मीटर होत असल्याचे कळवले आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्रात ८,०८७.०५ चौ. मीटर वाढ होत आहे. त्यामुळे हा खर्च वाढल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
४) या प्रकल्पासाठी ९७ कोटी ८१ लाख रुपये खर्च अपेक्षित होता. आता हा खर्च १२० कोटींच्या घरात गेला आहे.