मुंबई : पावसाळ्यात घडणाऱ्या दुर्घटना पाहता पोलिसांनी समुद्र किनारे, धबधबे, नदी आदी जीवघेण्या ठरणाऱ्या पर्यटनस्थळी प्रतिबंध घातलेला असतानाही भाईंदरच्या उत्तन, तर घोडबंदरच्या चेणे येथील लक्ष्मी नदी परिसर, भाईंदरच्या खाडी किनारी पर्यटकांची गर्दी दिसते आहे. समुद्र खवळलेला असतानाही जीवाची पर्वा न करता तसेच सेल्फी काढणाऱ्या पर्यटकांनी उच्छाद मांडला आहे.
उत्तन येथील वेलंकनी चर्चजवळ समुद्र किनारी रविवारी मोठ्या संख्येने पर्यटक जमले होते. समुद्र खवळलेला असून, धोक्याचा लाल बावटा येथे लावलेला आहे. परंतु, त्याची पर्वा न करता बेशिस्त लोक खवळलेल्या समुद्रात आंघोळीसाठी उतरलेले होते.
पालकही मुलांसह उतरले पाण्यात-
१) समुद्रात मोठ्या लाटा उसळत असताना समुद्रातील खडकांवर सेल्फी घेत होते. अनेक पालक तर मुलांना घेऊन पाण्यात उतरले वा धक्क्यावर समुद्राच्या जवळ जाऊन उभे होते.
२) केवळ मौजमजेच्या नावाखाली आपला जीव धोक्यात घालणाऱ्या लोकांना प्रतिबंध करण्यासाठी संबंधित प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
३) किनाऱ्यावर धोक्याचे व कायदेशीर कारवाईचा इशारा देणारे फलक लावणे, सुरक्षा रक्षक नेमणे व पोलिसांची नियुक्ती करणे गरजेची आहे, असे मत सुज्ञ नागरिकांतून व्यक्त होत आहे.