Join us  

सांगा, आम्ही चालायचे तरी कसे? गोरेगाव रेल्वे स्थानकाबाहेरील परिसर फेरीवाल्यांनी व्यापला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 11:13 AM

गोरेगाव पूर्व-पश्चिमेतील रेल्वेस्थानकाच्या बाहेरील रस्त्यांवर सकाळी-सायंकाळी  फेरीवाल्यांचे अतिक्रमण पाहायला मिळते.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गोरेगाव पूर्व-पश्चिमेतील रेल्वेस्थानकाच्या बाहेरील रस्त्यांवर सकाळी-सायंकाळी  फेरीवाल्यांचे अतिक्रमण पाहायला मिळते. रेल्वेस्थानकांत ये-जा करणारे प्रवासी तसेच या रस्त्यांवरून मार्गक्रमण करणारी वाहने, यामुळे या रस्त्यांवर पाय ठेवायलाही जागा नसते. त्यामुळे सांगा आम्ही रस्त्यांवरून चालायचे तरी कसे? असा सवाल गोरेगावमधील रहिवासी पालिका प्रशासनाला विचारत आहे.

पालिकेच्या ‘पी दक्षिण’  विभागात फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर आहे. फेरीवाल्यांमुळे गोरेगाव पूर्व व पश्चिमेतील बेस्टच्या स्थानकांतून बस बस बाहेर काढताना चालकांना तर तारेवरची कसरत करावी लागते. गोरेगाव पश्चिमेला स्थानकाबाहेर, बेस्ट डेपो बाहेर तर ठेले लावतात. त्यामुळे अंधेरी दिशेकडील रस्ताही दिसत नाही.  रस्त्यावरून चालताना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागतो, याकडे रहिवाशांनी लक्ष वेधले आहे.

पालिकेकडून ठोस कारवाईची प्रतीक्षा -

१) गोरेगाव पूर्वेतील डीपीरोड स्थानकापासून १५० मीटरच्या अंतरात आहे. या रस्त्यावरील एचडीएफसी बँकेबाहेर अनेक फेरीवाले, कपडे विक्रेते ठाण मांडून बसतात. तर चर्चगेट दिशेला पादचारी पुलाजवळ ठाण मांडणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांमुळे पादचारी रस्ता अरुंद होतो. 

२) त्यातूनच रिक्षा वाट काढतात. त्यामुळे नागरिकांना येथील पादचारी पूल चढताना-उतरताना तारेवरची कसरत करावी लागते, ही वस्तुस्थिती आहे. यावर ‘पी दक्षिण’ विभागाकडून ठोस कारवाई अपेक्षित आहे.

फेरीवाल्यांवर कारवाई करावी, यासाठी गोरेगावातील जागरूक नागरिक पालिकेच्या ‘पी दक्षिण’ विभागाकडे तक्रारी करतात. त्यावेळी तात्पुरती कारवाई होते.  फेरीवाले पुन्हा येथील रस्त्यांवर आपला पसारा मांडतात. मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून पालिका प्रशासनाची कानउघडणी केली आहे. ‘पी दक्षिण’चे सहायक आयुक्त येथील अनधिकृत फेरीवाल्यांवर  ठोस कारवाई करून नागरिकांसाठी हा रस्ता मोकळा करतील का? - संदीप सावंत, संस्थापक अध्यक्ष, साद-प्रतिसाद संस्था

पालिका प्रशासन सातत्याने येथील फेरीवाल्यांवर कारवाई करते. त्यांचे साहित्यही जप्त करते. गणपती विसर्जनानंतर फेरीवाला हटाव मोहीम पालिका प्रशासन जोमाने राबवणार आहे. - संजय जाधव, सहायक आयुक्त, पी दक्षिण विभाग

टॅग्स :मुंबईगोरेगावफेरीवालेरेल्वे