फुलांच्या दरांमध्ये ६० % वाढ; सजावट, पूजनासाठी मागणी, हारांचे भावही तोऱ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 10:43 AM2024-09-12T10:43:32+5:302024-09-12T10:45:48+5:30
गौरी-गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर दादर येथील फूल बाजारात फुलांची मोठ्या प्रमाणावर आवक होऊनही दर चढेच आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गौरी-गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर दादर येथील फूल बाजारात फुलांची मोठ्या प्रमाणावर आवक होऊनही दर चढेच आहेत. साधारणत: कोणत्याही मालाची आवक वाढली, की त्याच्या दरांत घसरण होते. मात्र, या सणात फुलांना मोठी मागणी असल्याने फुले, हारही भाव खात आहेत. सध्या फुलांच्या दरांमध्ये ५० ते ६० टक्के वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे. परंतु, व्यवसाय वाढल्याने व्यापाऱ्यांमध्ये नवचैतन्य पाहायला मिळत आहे.
दादर येथील फूल मार्केट गणेशोत्सवाच्या दोन दिवस अगोदरपासूनच फुलले होते. गणपतीच्या सजावाटीसाठी, पूजेसाठी फुले तसेच पत्री म्हणून पानांना मोठ्या प्रमाणावर मागणी होती. गौरी-गणपतीनिमित्त ग्राहकांची फुले खरेदीसाठी तेव्हापासून होत असलेली गर्दी बुधवारी ज्येष्ठ गौरी पूजनाच्या दिवशीही कायम होती.
गुलाबाचे दर -
गणेश चतुर्थी दिवशी एक गुलाबाचे फुल हे २० ते २५ रुपयांनी विकले गेले.
फुले-
१) गुलाब-१२० रुपयांना १० नग
२) कमळ-३० रुपये प्रति नग
३) जास्वंद- १० रुपये प्रति नग
४) मोगरा- ८०० रुपये प्रति किलो
५) झेंडू- १८० ते २०० रुपये प्रति किलो
६) शेवंती- ४०० रुपये प्रति किलो
७) लहान हार- ५० ते १५० रुपये प्रति नग
८) मोठा हार- २०० ते १,००० रुपये प्रति नग
विविध फुले दाखल-
बाजारात झेंडू, लीली, शेवंती, गुलाब, मोगरा, चाफा, चमेली, अबोली, कन्हेरी ही फुले, हार विक्रीमधून दररोज कोट्यवधींची उलाढाल सुरू आहे. या काळात झेंडू, शेवंती या फुलांच्या हारांना मोठी मागणी आहे.
सणासुदीच्या निमित्ताने फुलांची आवक वाढली आहे. त्याचप्रमाणे दरांतही वाढ झाली आहे. महाराष्ट्रात सर्वच भागांत सध्या सुधारित शेतकरी फुलांच्या लागवडीकडे विशेष लक्ष देत असल्यामुळे फुलांचा दर्जादेखील सुधारला आहे. त्यामुळे ग्राहकदेखील आनंदाने खरेदी करीत आहेत.- शुभम शिंदे, फुल विक्रेते
गेल्या काही दिवसांपासून दादर बाजारपेठेत झेंडू, मोगरा आणि गुलाबाच्या फुलांची आवक वाढली असून, दरही गगनाला भिडले आहेत. फुलांच्या तुलनेत फुलांपासून बनविलेल्या हारांना वाढीव दर मिळत आहे.