मुंबईतल्या खड्यांवर नोटिशीचे मलम; विलेपार्ले उड्डाणपुलाची अवघ्या चार महिन्यांत दुरवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 09:48 AM2024-07-25T09:48:36+5:302024-07-25T09:49:40+5:30
आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ कडून वांद्रे दिशेने जाणाऱ्या वाहनांचा प्रवास जलद व्हावा, यासाठी विलेपार्ले येथे उभारलेल्या उड्डाणपुलाला अवघ्या चारच महिन्यांत खड्डे पडल्याचे समोर आले आहे
मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ कडून वांद्रे दिशेने जाणाऱ्या वाहनांचा प्रवास जलद व्हावा, यासाठी विलेपार्ले येथे उभारलेल्या उड्डाणपुलाला अवघ्या चारच महिन्यांत खड्डे पडल्याचे समोर आले आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावून दंड आकारला आहे. मात्र, दंडाची रक्कम जाहीर केलेली नाही. त्याचबरोबर कंत्राटदाराकडून तत्काळ रस्त्याची दुरुस्ती करून घेण्यात आली आहे. पश्चिम दूतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यातच आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ कडून येणारी वाहनेही टर्मिनल १ जवळ दूतगती महामार्गावर दाखल होत असल्याने या भागातील कोंडीत भर पडते. टी २ टर्मिनलकडून येणाऱ्या वाहनांचा प्रवास जलद होण्यासाठी टी २ जंक्शन येथून वांद्रे दिशेला पश्चिम द्रुतगती मार्गाला टर्मिनल १ जवळ समांतर विलेपार्ले पूल उभारला आहे.
नंदगिरी गेस्ट हाऊसनजीक झाली होती दुरवस्था-
१) विलेपार्ले उड्डाणपुलासाठी ४८.४३ कोटींचा खर्च केला होता. एमएमआरडीएने १ मार्चमध्ये पूल वाहतुकीसाठी हा तुकीसाठी खुला केला होता. मात्र, पहिल्या पावसातच या उड्डाणपुलावरील नंदगिरी गेस्ट हाऊसनजीकच्या भागात या रस्त्याला खड्डे पडल्याचे आढळून आले.
२) विलेपार्ले येथील टी १ उड्डाणपुलावर खड्डे पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित २ कंत्राटदाराला आणि प्रकल्प व्यवस्थापकाला याबाबत माहिती देण्यात आली.तातडीने हे सर्व खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण करण्यात आले. यासंबंधी कंत्राटदार आणि सल्लागाराला दंड ठोठावण्यात आला आहे, महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, अशी माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली.
मेट्रो स्थानकात लागली गळती-
१) मेट्रो २ अ मार्गिकेवरील डी. एन. नगर स्थानकातही पावसाचे पाणी गळत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
२) त्यावर तोडगा काढण्यासाठी महामुंबई मेट्रोने स्थानकात बादल्या ठेवल्या होत्या.
३) या गळतीबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर महामुंबई मेट्रोने मंगळवारी रात्री दुरुस्ती केली.
४) खांबाच्या एक्सपान्शन जॉइंटमधून पाणी गळत असल्याचे महामुंबई मेट्रोकडून सांगण्यात आले.