मुंबई :दिंडोशीच्या जंगलात स्थानिक विकासकाने काँक्रिटीकरण सुरू केले आहे. यामुळे गोरेगाव पूर्वेतील नागरी निवारा धबधब्याकडे जाणाऱ्या सर्व पायवाटा त्यांनी बंद केल्या आहेत. पावसाळी पर्यटनासाठी येत असलेल्या पर्यटकांचा हिरमोड होत असल्याने निसर्गप्रेमींनी नाराजी व्यक्त केली.
पावसाळा सुरू झाला की निसर्गाच्या सान्निध्यात खळखळणारा झरा, धो-धो वाहणारा धबधबा आणि हिरवाईत भटकंती करायची ओढ निसर्गप्रेमींना लागते. गोरेगाव पूर्वेतील नागरी निवारा १ व २ समोरील डोंगरातील धबधबा प्रवाहित झाला आहे. वालभट नदीचे मुख्य उगमस्थान असलेल्या या धबधब्यावरून मुंबईचे सौंदर्य दिसते. स्थानिक विकासकाने या परिसरात जाणाऱ्या चारीही वाटा बंद करीत जंगलात काँक्रिटीकरण सुरू केले आहे. यामुळे निसर्गप्रेमी पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली.
डोंगर वाचविण्यासाठी लढ्याची गरज-
दिंडोशी डोंगराच्या उत्खननामुळे भविष्यात रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीसारखी दरड कोसळून लगतच्या न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतींना मोठा धोका पोहोचण्याची भीती साद-प्रतिसाद संस्थेचे संस्थापक संदीप सावंत यांनी व्यक्त केली. हा डोंगर आणि धबधबा नामशेष होण्याच्या मार्गावर असून एका विकासकाने येथे आयटी पार्कच उभारले आहे.
यामध्ये अनेक कंपन्यांची आलिशान कार्यालये आहेत. या परिसरात वन्य प्राण्यांचा वावर दिसून येतो. मुंबईतील पर्यावरणप्रेमींनी याकडे लक्ष दिले पाहिजे. मुंबईकरांनी दिंडोशीचा डोंगर व नागरी निवारा धबधबा वाचवण्यासाठी मोठे आंदोलन उभारले पाहिजे, असे आवाहन सावंत यांनी केले.