मुंबई : जाहिरात फलकांबाबत मुंबई महापालिकेने आखलेल्या धोरणांचे, आकाराबाबत निर्देशांचे पालन रेल्वे प्रशासनाला करावे लागणार असल्याचे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे सोमवारी पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आणि पालिका प्रशासनाची बैठक पालिका मुख्यालयात पार पडली. महाकाय आकाराच्या होर्डिंगमुळे मुंबईत पुन्हा घाटकोपर दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून ते वेळीच काढून टाका, अशा सूचना पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणने रेल्वेला दिल्या आहेत. त्यामुळे रेल्वे हद्दीतील ४५ पैकी ३८ होर्डिंग्ज काढण्याची कार्यवाही रेल्वेकडून पार पाडली जाणार का? याकडे लक्ष लागून राहिले आहे.
मुंबईची भौगोलिक स्थिती, समुद्र किनाऱ्याला लागून असलेला प्रदेश लक्षात घेता पर्यायाने हवामान व वाऱ्याची स्थिती पाहता ४० बाय ४० फुटांपेक्षा अधिक आकाराचे जाहिरात फलक लावण्यास महापालिका परवानगी देत नाही. असे असतानाही रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत मुंबई महापालिका रस्ते आणि खासगी जागेलगतच्या ठिकाणी हे फलक उभारल्याचे आढळून आले आहे. घाटकोपरमध्ये घडलेल्या घटनेसारखा प्रसंग पुन्हा उद्भवू नये, यासाठी रेल्वे हद्दीतील ४० बाय ४० फुटांपेक्षा अधिक आकाराचे सर्व जाहिरात फलक तातडीने हटवण्याचे निर्देश मुंबई जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणने दिले आहेत. मात्र, रेल्वेने या नोटिशीला, जाहिरात फलकांच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान दिले होते. त्यावर न्यायालयाने १० जुलै रोजी सुनावणी घेऊन निर्देश दिले. यानुसार, मुंबई महापालिकेच्या जाहिरात फलकांबाबत रेल्वे आणि पालिका प्रशासनाची बैठक सोमवारी पार पडली.
घाटकोपर, दादर, माटुंग्यातील इगो मीडिया कंपनीचे फलक हटवले-
१) मध्य आणि पश्चिम रेल्वे हद्दीत ४० बाय ४० फुटांपेक्षा जास्त आकाराचे ४४ जाहिरात फलक होते. यापैकी इगो मीडिया कंपनीचे जाहिरात फलक घाटकोपरसह दादर, माटुंगा येथून हटविण्यात आले.
२) त्यानंतर ३६ महाकाय जाहिरात फलक बाकी होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेल्याने ते हटवण्यात आले नाहीत. आता रेल्वेला हे फलक काढावे लागणार आहेत.
जाहिरातदारांना केली आहे सूचना-
१) बैठकीत ४० बाय ४० पेक्षा मोठ्या आकाराचे होर्डिंग्ज रेल्वने काढून टाकावेत, या मुद्यावर बैठकीत जोर देण्यात आला. पश्चिम रेल्वेमार्गावर ज्या ठिकाणी ४० बाय ४० पेक्षा मोठ्या आकाराचे होर्डिंग्ज आहेत, त्या जाहिरातदारांना अशा होर्डिंगचे आकार लहान करण्यासाठीचे पत्र पाठविण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.
२) माहीम, वांद्रे, चर्नी रोड या ठिकाणी हे होर्डिंग्ज आहेत. मुंबई विभागाने जाहिरातदारांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत.