मुंबई : सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करणाऱ्या म्हाडा प्राधिकरणाने २०३० घरांची लॉटरी जाहीर केली असली तरी या घरांच्या किमतीही अव्वाच्या सव्वा आहेत. मात्र, खासगी बिल्डरांच्या तुलनेत घराच्या किमती कमी असल्याने म्हाडाच्या २०३० घरांसाठी किती अर्ज येतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ताडदेव येथील उच्च गटासाठीच्या घरांची किंमत सर्वाधिक म्हणजे साडेसात कोटींवर आहे. ताडदेव येथील क्रिसेंट टॉवरमध्ये उच्च उन्न गटासाठी घरे आहेत. १४१ चौमी क्षेत्रफळाच्या घराची किंमत ७ कोटी ५२ लाख ६१ हजार ६३१ रुपयेआहे. ही दोन घरे आहेत, तर १४२ चौमी क्षेत्रफळाच्या घराची किंमत ७ कोटी ५७ लाख ९४ हजार २६८ रुपये आहे. ही ३ घरे आहेत. त्याचबरोबर विक्रोळी, कुर्ला, बोरिवली, अंधेरी, सांताक्रूझ, मुलुंड, चेंबूर, ओशिवरा, करिरोड, वडाळा, लोअर परळ, माझगाव, भायखळा, दादर, माहीम, घाटकोपर, मानखुर्द आणि कांदिवलीमध्ये विविध उत्पन्न गटासाठी घरे आहेत. या घरांच्या किमतीही २९ लाखांपासून ४ कोटींच्या घरात आहेत.
१) अॅन्टॉप हिल येथे अत्यल्प गटासाठी ८७ घरे असून, घराची किंमत ५१ लाख ४१ हजार रुपये आहे.
२) विक्रोळीमध्ये (पॉकेट २) अल्प गटासाठी ८८ घरे असून, घराची किंमत ६७ लाख १३ हजार रुपये आहे.
३) विक्रोळी येथे (पॉकेट १) अल्प गटासाठी ८६ घरे असून, घराची किंमत ५० लाख ३१ हजार आहे.
४) मालाडमध्ये अल्प गटासाठी घरे असून, ५८ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या घराची किंमत ७० लाख ८७ हजार आहे, तर ५९ चौ. मीटर घराची किंमत ८६ लाख ११ हजार आहे.
५) गोरेगावमधील मध्यम गटासाठीच्या घरांची किंमत १ कोटी ११ लाख ९४ हजार ७५५ रुपये असून, त्याचे क्षेत्रफळ ७३ चौमी आहे.
६) पवईमधील मध्यम गटासाठीच्या घराची किंमत १ कोटी २० लाख १३ हजार असून, घराचे क्षेत्रफळ ६५ चौमी आहे, तर उच्च गटासाठीच्या घरांची किंमत १ कोटी ७८ लाख ७१ हजार ६५० रुपये असून, क्षेत्रफळ ९१ चौमी आहे.
७) गोरेगावमध्ये उच्च गटासाठीच्या घरांची किंमत १ कोटी ३३ लाख ७१ हजार आहे. त्याचे क्षेत्रफळ ९१ चौमी आहे.