Join us

रेल्वेच्या डब्यांवर दिसणार पॅनोरमा 'डिजिटल डिस्प्ले'; गार्डने दिलेली माहिती फलाटावर मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 10:43 AM

मुंबई पश्चिम उपनगरी रेल्वे डब्यांवर लवकरच पॅनोरमा डिजिटल डिस्प्ले बसविण्यात येणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई पश्चिम उपनगरी रेल्वे डब्यांवर लवकरच पॅनोरमा डिजिटल डिस्प्ले बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना आता रेल्वे प्लॅटफॉर्म कडेच्या बाजूने देखील सर्व माहिती समजणार आहे. ही माहिती इंग्रजी, मराठी आणि हिंदी अशा तिन्ही भाषांमध्ये ३ सेकंदांच्या अंतराने दिसेल.

उपनगरी रेल्वेच्या १२ डब्यांच्या गाडीच्या दर्शनी भागावर दोन्ही बाजूला मिळून एकूण आठ डिजिटल डिस्प्ले बसविण्यात येणार आहेत. ज्यामुळे प्रवाशांना ट्रेनचा क्रमांक, ट्रेन सुरू होण्यापूर्वी गार्डने दिलेली माहिती आता प्लॅटफॉर्मवर बसूनदेखील मिळविणे शक्य होणार आहे.

सध्या डब्यांच्या आतमध्ये आणि मोटरमन केबिनच्या दर्शनी भागावर लोकांना प्रवासाबाबत माहिती मिळत होती. पण, प्लॅटफॉर्मवर थांबलेल्या प्रवाशांना ती सहजरीत्या समजत नव्हती. यासाठी आता रेल्वेने डब्यांच्या बाहेरील बाजूसदेखील माहिती प्रदर्शित करणार आहे. सध्या एका गाडीवर असा डिस्प्ले बसविण्यात आला असून, येत्या काळात पश्चिम रेल्वेच्या आणखीन १० गाड्यांवर असे डिस्प्ले बसविण्यात येणार आहेत.

पॅनोरमा डिस्प्लेची वैशिष्ट्ये काय ?

१) फुल एचडी टीएफटी (पातळ फिल्म ट्रान्झिस्टर) डिस्प्ले.

२) डिस्प्ले याडफ काचेने संरक्षित. 

३) माहिती ५ मीटर अंतरापर्यंत स्पष्ट दिसण्यासाठी कॉन्ट्रास्ट सेन्सरद्वारे स्वयंचलितपणे नियंत्रित केली जाणार आहे.

४) नट सैल झाल्यास डिस्प्ले पडू नये म्हणून सर्व नट स्लिप्ट पिनने लॉक केले आहेत. 

टॅग्स :मुंबईपश्चिम रेल्वेप्रवासी