‘प्रियदर्शनी’ चे रूपडे पालटणार, सुशोभीकरणासाठी २ कोटींचा निधी मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 10:40 AM2024-08-19T10:40:45+5:302024-08-19T10:43:13+5:30
मुंबईत मोकळ्या जागांचा अभाव असताना प्रियदर्शनी पार्कसारखी मोकळी जागा राखलेली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईत मोकळ्या जागांचा अभाव असताना प्रियदर्शनी पार्कसारखी मोकळी जागा राखलेली आहे. या पार्कच्या सुशोभीकरणासाठी २ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
माजी मंत्री मुरली देवरा यांच्या प्रयत्नातून सुरू झालेला प्रियदर्शनी पार्कला हेरिटेजचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असल्याची माहिती शहर पालकमंत्री तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. प्रियदर्शनी पार्क येथे सुरू करण्यात आलेल्या चिल्ड्रेन पार्कच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते. प्रियदर्शनी पार्क ही अत्यंत सुंदर जागा बनली असून येणाऱ्या काळात मुंबईत येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षण ठरेल, असा विश्वास केसकर यांनी व्यक्त केला. पार्क ही मलबार हिल परिसरातील मैदानाची मोठी जागा असून ज्येष्ठ नागरिकांपासून लहान मुलांपर्यंतचा येथील वावर कायम असतो.
१०० वृक्षांची लागवड केली-
जागेच्या सुशोभीकरणासाठी प्रशासनाकडून निधी देण्यात आला आहे. या अंतर्गत वाढत्या जागतिकीकरणाचे संकट लक्षात घेऊन प्रियदर्शनी पार्क कमिटीकडून येथे नारळ आणि बॅरिंगटोनिया प्रकारातील १०० वृक्षांची लागवड करण्यात आली. शिवाय लहान मुलांसाठी चिल्ड्रेन पार्क ही तयार करण्यात आले आहे. याचे उद्घाटन करण्यात आले.
सामान्यांसाठी खुले-
१) अमेरिका व न्यूयॉर्कच्या धर्तीवर मुंबईत लवकरच सेंट्रल पार्क उभे केले जाणार आहे.
२) हे सेंट्रल पार्क महालक्ष्मी रेसकोर्सच्या आजूबाजूला तयार होणार आणि हे सर्व सामान्य नागरिकांसाठी खुले असणार आहे, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
३) यावेळी त्यांच्यासह खासदार मिलिंद देवरा, प्रियदर्शनी पार्क कमिटीच्या सरचिटणीस ॲड. सुशीबेन शाह तसेच महापालिकेचे अधिकारी याची उपस्थिती होती.