मोलकरणीने ‘इन्स्टा’वर टाकला फोटो अन् दागिन्यांच्या चोरीचा लागला छडा; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 10:20 AM2024-09-21T10:20:45+5:302024-09-21T10:23:47+5:30
चोरीचे दागिने घालून स्वतःचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि एका मोलकरणीवर गुन्हा दाखल झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : चोरीचे दागिने घालून स्वतःचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि एका मोलकरणीवर गुन्हा दाखल झाला. मोलकरणीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला फोटो हा तिने ज्यांच्याकडे चोरी केली त्या मालकिणीने पाहिल्यानंतर मालकिणीने खार पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी संजना गुजर या मोलकरणीवर ८ लाखांचे दागिने चोरल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला.
तक्रारदार यांच्याकडे संजना ही १२ ते २१ जानेवारीदरम्यान कामावर होती. तक्रारदार यांची जुनी मोलकरीण सुटीवर गेल्याने त्यांनी संजना हिला बदलीवर ठेवले होते. मात्र जुनी मोलकरीण परतल्यानंतर संजना हिला त्यांनी कामावरून काढून टाकले. त्यानंतर १९ फेब्रुवारीला कार्यक्रमाला जाण्यासाठी तक्रारदारांनी त्यांचे कपाट उघडले, तेव्हा पाच सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या अंगठ्या तसेच कानातील रिंग आढळली नाही. त्यांनी घरकाम करणाऱ्या शकुंतला, सलोनी यांनाही विचारले. मात्र त्यांनाही कल्पना नसल्याचे त्या म्हणाल्या. तेव्हा त्यांनी संजना हिला फोन केला तेव्हा तिनेसुद्धा दागिने घेतले नसल्याचे सांगितले.
...आणि हातातील अंगठी दिसली
१० सप्टेंबर रोजी तक्रारदार या घरी इन्स्टाग्राम पाहत असताना त्यांनी संजना हिने शेअर केलेले फोटो पाहिले. ज्यामध्ये तिच्या हातात तक्रारदाराची चोरी झालेली अंगठी दिसली. तेव्हा पाच अंगठ्या आणि कानातली रिंग तिनेच चोरी केल्याचे उघड झाले. खार पोलिसांत तक्रार दिल्यानंतर गुजरविरोधात भारतीय दंड संहिता कलम ३८१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.