Join us  

पाठ्यपुस्तकातील मराठी भाषेची तपासणी व्हावी; राज्य भाषा सल्लागार समितीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 10:46 AM

राज्य शिक्षण मंडळांतर्गत येणाऱ्या सर्व इयत्तांच्या पाठ्यपुस्तकातील मराठी भाषेचा वापर योग्य आहे की नाही ते तपासून शासनास अहवाल सादर करावा. अशी मागणी राज्य भाषा सल्लागार समितीकडून करण्यात आली आहे.

मुंबई : राज्य शिक्षण मंडळांतर्गत येणाऱ्या सर्व इयत्तांच्या पाठ्यपुस्तकातील मराठी भाषेचा वापर योग्य आहे की नाही ते तपासून शासनास अहवाल सादर करावा. यासाठी संबंधित अशासकीय तज्ज्ञांच्या एका समितीची शासनाने नियुक्ती करावी, अशी मागणी राज्य भाषा सल्लागार समितीकडून करण्यात आली आहे.

समितीचे सदस्य श्रीपाद जोशी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री आणि बालभारतीचे अध्यक्ष कृष्णकुमार पाटील यांना पत्राद्वारे मागणी केली आहे. बालभारतीच्या पहिलीच्या मराठीच्या पुस्तकातील ‘जंगलात ठरली मैफल’ या कवितेत वापरलेल्या इंग्रजी शब्दांवरून वाद प्रतिवाद सुरू आहेत. त्यासंदर्भात साहित्यिक आणि भाषातज्ज्ञ यांच्याकडून मत-मतांतरे व्यक्त होत आहेत. ‘जंगलात ठरली मैफल’ ही मूळ कविता पूर्वी भावे यांची आहे. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून बालभारतीने पहिलीच्या वर्गासाठी लागू केलेल्या मराठी बालभारती या पुस्तकात या कवितेचा समावेश करण्यात आला आहे. यामधील इंग्रजी शब्दांमुळे ती आधी सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि आता भाषातज्ज्ञ, साहित्यिक, मराठी भाषेचे जाणकार, शिक्षण तज्ज्ञांकडून त्यावर मते व्यक्त होऊ लागली आहेत. मराठीच्या कवितेत इंग्रजी शब्दांच्या वापरामुळे मराठी भाषेवर चुकीचे संस्कार होत आहेत, ते थांबवावेत अशी टीका जोशी यांनी केली.

बालभारतीने खुलासा करावा-

१) बालभारतीकडून या कवितेची निवड करताना कोणते बालशैक्षणिक मानसशास्त्र बघितले गेले आहे, याचाही खुलासा बालभारतीने करावा, अशी मागणी केली आहे. 

२) बालभारतीच्या संपादक मंडळ तसेच अभ्यास मंडळ, निवड समिती यांना साहित्य नेमण्यासाठी त्यांना कोणत्या मार्गदर्शक सूचना आहेत, त्यांची प्रत बालभारतीने उपलब्ध करावी, असे त्यांनी म्हटले आहे. 

३) राज्याने प्रथमच मराठी भाषा धोरण तयार करून ते स्वीकारले आहे. त्यामुळे मराठी भाषेचा यथायोग्य वापर व्हावा, हा त्याचा पाया आहे. याकडे लक्ष देण्याची गरज समितीकडून व्यक्त करण्यात आली आहे.

टॅग्स :मुंबईशिक्षण क्षेत्रदीपक केसरकर राज्य सरकार