‘गॅस कनेक्शन’चे बिल थकल्याचा मेसेज महागात; महिला अधिकाऱ्यास दोन लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 11:08 AM2024-05-22T11:08:17+5:302024-05-22T11:21:43+5:30
महावितरण पाठोपाठ आता गॅस कनेक्शनचे बिल थकीत असल्याचा बहाणा करत सायबर भामट्यांनी फसवणूक सुरू केली आहे.
मुंबई : महावितरण पाठोपाठ आता गॅस कनेक्शनचे बिल थकीत असल्याचा बहाणा करत सायबर भामट्यांनी फसवणूक सुरू केली आहे. मध्य रेल्वेतील एका महिला अधिकाऱ्याला गॅस कनेक्शनचे बिल न भरल्यामुळे कनेक्शन बंद करण्यात येणार असल्याचे सांगून दोन लाखांना गंडवले आहे. याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.
मध्य रेल्वेत अधिकारी पदावर असलेल्या ५२ वर्षीय महिला अधिकाऱ्याच्या फिर्यादीनुसार, १८ मे रोजी घरी असताना पावणे बाराच्या सुमारास अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सॲप संदेश आला. त्यात, गॅस कनेक्शनचे बिल थकीत असल्याने, कनेक्शन बंद करण्यात येणार असल्याचे नमूद होते. त्यावर विश्वास ठेवून त्याखाली असलेली लिंक क्लिक केली. त्यावर काही माहिती भरून दोन हजार रुपये पाठवले. मात्र खात्यातून दोनशे ऐवजी दोन हजार रुपये गेल्याचे समजताच त्यांनी संबंधित क्रमांकावर संपर्क साधला.
बँकेचे व्यवहार थांबवले-
बँक खाते तपासताच महिला अधिकाऱ्याच्या खात्यातून एक लाख ८०० रुपये एका रिटेलमध्ये, तर ९९ हजार रुपये फ्लिपकार्ट इंटरमध्ये गेल्याचे समजताच त्यांना धक्का बसला. त्यानंतर बँकेने कॉल करून व्यवहाराबाबत चौकशी केली. त्यांनी हे व्यवहार करत नसल्याचे सांगताच, बँकेचे पुढील व्यवहार थांबविण्यात आले. यामध्ये एकूण दोन लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक झाली आहे.
कॉल धारकाने गॅस कनेक्शनची माहिती घेत बोलण्यात गुंतवले. कॉल सुरू असताना मोबाइल फोनच्या स्क्रीनवर ऑडिओ व व्हिडीओ कॉल फॉरवर्ड होत असल्याचे दिसून आले. संशय आल्याने त्यांनी कॉल कट केला.