मुंबई : मॉर्निग वॉकदरम्यान जुहूतील उच्चभ्रू परिसरात एका मुलीचा विनयभंग करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. दिनेश डाकवे (२५) असे या तरुणाचे नाव असून तब्बल ६० ते ६५ ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी गोरेगावच्या नेस्को परिसरातून त्याचा गाशा गुंडाळला.
जुहू चर्चच्या पोएट्री कॅफे समोर २१ जुलै रोजी सकाळी विनयभंगाचा हा प्रकार घडला होता. पीडित मुलगी मॉर्निंग वॉक करून तिच्या घरी परतत असताना आरोपीने वेगवेगळे आवाज काढून तिचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर अश्लील वर्तन करून तिला स्वत:कडे येण्याचा इशारा करत तिचा विनयभंग केला. हा प्रकार तिने सोशल मीडियावर आरोपीच्या व्हिडीओसह पोस्ट केला. त्याची दखल घेऊन जुहू पोलिसांनी या मुलीच्या घरी जाऊन चौकशी केली.
हुडी व मास्कची शक्कल...
आपण पकडले जाऊ नये, याकरिता वेगवेगळ्या रस्त्याने जाऊन काही कालावधीसाठी एकाच ठिकाणी आरोपी दिनेश बसून राहायचा. तसेच गुन्हा केल्यांनतर त्याने ओळख पटू नये याकरिता हुडी व मास्क परिधान केला. मात्र जुहू पोलिसांनी तीन दिवस सतत सीसीटीव्ही पाहणी करून अखेर आरोपीचा माग काढलाच.
निर्भया अधिकाऱ्यांनी दिली तक्रार-
१) विशेष म्हणजे पीडितेने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास नकार दिला. तेव्हा जुहू पोलीस ठाण्याच्या निर्भया अधिकारी व पोलीस निरीक्षक मेघा नरवडे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर भारतीय दंडसंहिता कलम ७९, सह कलम १२ पोक्सो अधिनियम अंतर्गत अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
२) या संवेदनशील घटनेची गंभीर दखल घेत परिमंडळ ९ चे पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव, निरीक्षक प्रमोद कांबळे तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक रणजित चव्हाण, उपनिरीक्षक अभिषेक पाटील आणि पथकाने परिसरातील सुमारे ६० ते ६५ ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करत गुन्हेगाराचा छडा लावला.