Join us  

खड्ड्यांमुळे ३० अभियंत्यांना नाेटीस; खुलाशानंतर कारवाई; खड्डे बुजवण्याची कामे पुन्हा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2024 9:59 AM

खड्ड्यांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन ते तातडीने बुजवण्यासाठी पालिकेने प्रत्येक विभागातील दोन दुय्यम अभियंत्यांवर जबाबदारी सोपवली आहे.

मुंबई : खड्ड्यांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन ते तातडीने बुजवण्यासाठी पालिकेने प्रत्येक विभागातील दोन दुय्यम अभियंत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. मात्र, या कामात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवून सुमारे ३० अभियंत्यांना पालिका प्रशासनाने आता ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. 

या अभियंत्यांकडून खुलासा आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. फक्त अभियंतेच नाही, तर कंत्राटदारांनाही जाब विचारण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, पाऊस कमी झाल्याने खड्डे बुजवण्याच्या कामाला गती देण्यात आली असून, गणपतीपूर्वी रस्ते पूर्ववत करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे.

दरम्यान, नोटीस मिळालेल्या अभियंत्यांनी खड्डे बुजवण्यात झालेल्या विलंबाबद्दल संबंधित कंत्राटदाराकडे बोट दाखवल्याचे कळते. कंत्राटदाराने वेळेत सामग्री आणि मनुष्यबळ पुरवले नसल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. अभियंत्यांनी खड्डे बुजवले होते, मात्र जुलै महिन्यातील मुसळधार पावसाने पुन्हा खड्डे पडले. खड्डे बुजवण्यासाठी अभियंत्यांनी अतिरिक्त वेळेतही काम केलेले आहे. मात्र कंत्राटदारांनी त्यांना वेळीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे या प्रकरणी अभियंत्यांवर कारवाई करू नये, अशी विनंती अभियंता संघटनेने पालिका आयुक्तांकडे केली आहे.

पुन्हा खड्डे का पडले, याची चौकशी होणार...

१)  यासंदर्भात अपर आयुक्त अभिजीत बांगर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, नोटीस बजावलेल्या अभियंत्यांकडून खुलासा अपेक्षित आहे. 

२)  त्यांनी पाठवलेल्या खुलाशानंतर  खड्डे बुजवण्याच्या कामात नेमकी दिरंगाई कोणामुळे झाली, कोण जबाबदार आहे, हे स्पष्ट होईल. 

३)  त्यानंतर पुढील कार्यवाही होईल. फक्त अभियंतेच नव्हे, तर कंत्राटदारांचीही चौकशी होईल. ज्या रस्त्यावरील खड्डे बुजवले होते, तेथे पुन्हा खड्डे का पडले? याचीही चौकशी होईल.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाखड्डे