तुमच्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करा वेळेत; पालिकेच्या १,८५५ जणांना नोटिसा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 10:11 AM2024-04-08T10:11:21+5:302024-04-08T10:12:48+5:30
गृहनिर्माण, शासकीय संस्थांना इशारा.
मुंबई : जोरदार वाऱ्यांसह होणाऱ्या पावसामुळे झाडे तसेच फांद्या रस्ते, घरांवर पडून अपघात होऊ नये यासाठी धोकादायक झाडे, फांद्यांची छाटणी अशा कामांवर पालिकेच्या उद्यान विभागाने भर दिला आहे. मात्र, गृहनिर्माण सहकारी संस्था, शासकीय-निमशासकीय संस्था, खासगी जागांमधील झाडांची निगा घेण्याची जबाबदारी ही संबंधित संस्था, मालकाची किंवा वापरकर्त्याची असते. पालिकेने एक हजार ८५५ जणांना नोटिसा पाठवून धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी वेळेत करण्याचा इशारा दिला आहे.
पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा भाग म्हणून मोठ्या झाडांच्या, विशेषत: धोकादायक ठरू शकणाऱ्या झाडांच्या फांद्या योग्य व शास्त्रीय पद्धतीने छाटण्याची कामे सध्या उद्यान विभागाकडून सुरू आहेत. त्यासाठी मुंबईतील आकाराने मोठ्या अशा एक लाख ८६ हजार २४६ झाडांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी एक लाख ८५ हजार ९६४ झाडे ही रस्त्यांच्या कडेला आहेत.
लहान असलेल्या झाडांपासून कोणताच धोका नसल्याने त्यांचा सर्वेक्षणात विचार केला जात नाही. या पार्श्वभूमीवर एक लाख ११ हजार ६७० झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याचे उद्दिष्ट विभागाने ठेवले आहे. त्यापैकी १२ हजार ४६७ झाडांच्या फांद्यांची छाटणी झाली असून, ७ जून २०२४ अखेरपर्यंत उर्वरित ९९ हजार २०३ झाडांची छाटणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट उद्यान विभागाने ठेवले आहे.
सर्व प्रशासकीय विभागांमध्ये झाडांसंबंधित छाटणीच्या कामासाठी यंत्रसामग्री, मनुष्यबळ उपलब्ध आहे. गृहनिर्माण संस्थांनी महापालिकेची पूर्वपरवानगी घेऊन झाडांची योग्य छाटणी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावी. यामुळे पावसाळ्यात गैरसोय होणार नाही.- जितेंद्र परदेशी, उद्यान अधीक्षक, मुंबई पालिका उद्यान विभाग.
कोणत्या कामांचा समावेश?
पालिकेकडून पावसाळापूर्व कामांमध्ये मृत तसेच धोकादायक असलेली झाडे तोडणे, अनावश्यक फांद्यांची छाटणी, फळे व झावळ्या काढणे, उन्मळून पडलेल्या झाडांची विल्हेवाट लावणे, झाडांचे पुनर्रोपण करणे, झाडांच्या ढोली व पोकळ्या भरणे, झाडांचा तोल सुस्थितीत आणणे व झाडांची मुळे, खोड तसेच पानांवर कीटकनाशकांची फवारणी करणे आदींचा समावेश आहे. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ नुसार झाडांची छाटणी केली जाते.
पालिका क्षेत्रातील एकूण झाडे- २९,७५,०००
खासगी संस्थांच्या आवारातील झाडे- १५,५१,१३२
शासकीय संस्थांच्या परिसरातील झाडे- १०,६७,६४१