अबब! पालिकेने जूनमध्ये मारले ४० हजार उंदीर; ‘लेप्टोस्पायरोसिस’च्या प्रतिबंधासाठी उपाययोजना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 10:04 AM2024-07-03T10:04:18+5:302024-07-03T10:05:39+5:30
पावसाळा सुरू झाल्यावर मुंबईत डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस (लेप्टो) आदी साथींचे आजार पसरतात.
मुंबई : पावसाळा सुरू झाल्यावर मुंबईत डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस (लेप्टो) आदी साथींचे आजार पसरतात. त्यामुळे अशा आजारांचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जातात. त्यात लेप्टोस्पायरोसिसला प्रतिबंध करण्याकरिता जून महिन्यात महापालिकेने जवळपास तब्बल ४० हजार उंदीर मारले आहेत.
दरवर्षी रस्त्यांवर पाणी तुंबू नये, यासाठी महापालिका प्रयत्नशील असते. मात्र, पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने दरवर्षी मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचते. अनेकदा नागरिकांना दुसरा पर्यायी मार्ग नसल्याने ते याच पाण्यातून येजा करतात. रस्त्यांवरील बिळांमध्ये पाणी शिरल्याने घुशी, उंदीर बाहेर येतात. त्यांचे मलमूत्र साचलेल्या पाण्यात असते. शरीरावरील विशेषत: पायावर असलेली जखम अशा पाण्याच्या संपर्कात आल्यास लेप्टोस्पायरोसिस होतो. त्यामुळे साचलेल्या पाण्यात शक्यतो जाऊ नये, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
मुंबईत जूनमध्ये लेप्टोस्पायरोसिसचे २८ रुग्ण आढळून आल्याने या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. साचलेल्या पाण्यातून चालल्यानंतर ताप आल्यास औषधोपचारासाठी ८,००४ नागरिकांना गोळ्या दिल्या आहेत.
दुसरीकडे जूनमध्ये विषारी गोळ्यांचा वापर करून २,०५६ उंदीर मारले आहेत, तर पिंजरे लावून पकडून २,६२३ उंदीर मारले आहेत. त्याचबरोबर ३४ हजार ९६७ इतके सर्वाधिक उंदीर रात्रपाळीत पकडून मारले आहेत.
काय काळजी घ्याल?
१) पावसाच्या तुंबलेल्या पाण्यातून चालू नये. जर जायचेच असेल, तर गुडघ्यापर्यंत गमबूट घालावेत. जेणेकरून दूषित पाण्याचा संपर्क येणार नाही.
२) पायावर कोणतीही जखम असेल, तर तिच्यावर तत्काळ उपचार करावेत. कारण दूषित पाणी जखमेद्वारे शरीरात जाऊ शकते.
३) सांडपाणी मिसळलेल्या पाण्यातून चालू नये.
४) साचलेल्या पाण्यातून चालून आल्यावर घरी पूर्ण शरीर स्वच्छ धुऊन घ्यावे.