लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर, कुर्ला पूर्व, साकीनाका, जोगेश्वरी, मालाड येथील २९१ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका कायम आहे. याठिकाणी २२ हजारांहून अधिक रहिवासी वास्तव्य करत आहेत. रहिवाशांच्या सुरक्षेसाठी संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्याचबरोबर रहिवाशांचे पुनर्वसन व स्थलांतर करण्यात येणार आहे. यासाठी ११५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
मुंबईत २९१ ठिकाणी दरडींचा धोका असून, त्यातील २०० हून अधिक ठिकाणे ही कुर्ला ते मुलुंड पश्चिम पर्यंतच्या भागात आहेत. विक्रोळी, भांडुपपर्यंत १३२, घाटकोपरमध्ये ३२ ठिकाणे धोकादायक आहेत. कुर्ला येथे १८ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका आहे. मुलुंड येथील पाच ठिकाणे, देवनार परिसरात ११, मालाडमध्ये १८ आणि मलबार हिल, ताडदेव परिसरात १६ अशी धोकादायक ठिकाणे आहेत.
हे काम पावसाळ्यानंतर लगेच सुरू होणार असल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
९,६०० झोपड्यांचे होणार स्थलांतर-
मुंबईतील २९१ ठिकाणे ही डोंगराळ भागातील धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. त्या ठिकाणी अजूनही २२ हजार ४८३ झोपड्यांपैकी नऊ हजार ६५७ झोपड्यांना इतरत्र स्थलांतरित करण्याची शिफारस मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने यापूर्वी राज्य सरकारकडे केली आहे.