Join us

पुतण्यानेच केली काकाची तिजोरी रिकामी; पाइपवरून चढून गाठला नववा मजला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 10:36 AM

पाइपने सहाव्या मजल्यावरून नववा मजला गाठून पुतण्याने काकाची तिजोरी रिकामी केल्याचे उघडकीस आले.

मुंबई : पाइपने सहाव्या मजल्यावरून नववा मजला गाठून पुतण्याने काकाची तिजोरी रिकामी केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी दानिश कुरेशी (३१) याला अटक केली. आरोपीने पोल्ट्री दुकानात ठेवलेले २५ लाखांचे दागिने आणि आईचे गहाण ठेवलेले दागिने परत मिळवण्यासाठी एका ज्वेलर्सला दिलेले ४ लाख रुपयांहून अधिक रुपयांचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. ३० मेच्या रात्री कुरेशी आणि तक्रारदाराच्या मुलाने ताडदेव येथील एका ज्यूस सेंटरमध्ये जाण्याचा बेत आखला. कुरेशीने त्याच्या चुलत भावाला बोलावून खाली थांबायला सांगितले. कुरेशीने डक्ट एरियातील ड्रे-इन पाइपने त्याच्या काकाच्या फ्लॅटवर गेला. यादरम्यान त्याने, मुख्य दरवाजाची आतून कडी लावून मौल्यवान वस्तू चोरल्या. मात्र, फ्लॅटमधून बाहेर पडताना तो कडी उघडण्यास विसरला. त्यामुळे तो पाइपने खाली आला. तेथे वस्तू ठेवून तो खाली भावासोबत गेला. दरम्यान, दोघे ज्यूस सेंटरवरून परतल्यानंतर तक्रारदाराच्या मुलाने फ्लॅटचा दरवाजा चावीने उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो उघडला नाही. त्याने मोठ्या भावाला सांगितले. त्यांनी चावी बनविणाऱ्याच्या मदतीने दरवाजा उघडला असता आतून  लटकलेला असल्याने त्यांना संशय आला. घरातील किमती ऐवजांची झाडाझडती घेतली असता ३० लाखांचा ऐवज गायब असल्याचे लक्षात आले.

असा उघडकीस आला गुन्हा-

तपासादरम्यान, नवव्या मजल्यावरील फ्लॅटमधील खिडक्या तसेच दोन खालच्या मजल्यावरील फ्लॅट्समध्ये ग्रिल दिसून आले नाही. खालच्या फ्लॅटमध्ये वयोवृद्ध दाम्पत्य असल्याने त्यांच्यावर संशय आला नाही. त्यानंतर सहाव्या मजल्यावर पोहोचले. दानिशचे संशयास्पद वागणे पाहून पाेलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरी केल्याची कबुली दिली.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीपोलिसचोरी