मनोहर कुंभेजकर, मुंबई: कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र, अंधेरी, (पश्चिम) या संस्थेने नवनिर्वाचित उत्तर मध्य मुंबईच्या खासदारवर्षा गायकवाड खासदार व राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे या खासदारांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्यांचा सन्मान चिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष विजय जाधव हे अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे सरचिटणीस चंद्रकांत बच्छाव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला व संस्थेची पुढील वाटचाली बाबत सविस्तर माहिती दिली.
सत्काराला उत्तर देताना खासदार वर्षा एकनाथ गायकवाड म्हणाल्या की, "माझे वडील माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनी मला दोन गोष्टी शिकवल्या.प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा महत्त्वाची आहे, ती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे व दुसरी गोष्ट त्यांच्या नावाला काळिमा फासला जाणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. जनतेने मला बहुमताने निवडून दिल्याबद्दल व संस्थेने पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे.आंबेडकरी चळवळ पुढे नेण्यासाठी नवीन पिढीने प्रयत्न करावेत असे प्रतिपादन त्यांनी केले. देशाच्या हितासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार टिकवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीत राहील", असेही खासदार गायकवाड शेवटी म्हणाल्या.
सत्काराला उत्तर देताना खासदार चंद्रकांत हंडोरे म्हणाले की, "सामाजिक बांधिलकी व आंबेडकरी चळवळ याची जाण ठेवून संस्था चांगले कार्य करते. समाजाच्या हितासाठी व प्रगतीसाठी आपल्याला चळवळ व संघर्ष केल्याशिवाय काहीही मिळत नाही. जग झपाट्याने पुढे जात आहे, त्यामुळे प्रत्येकाने शिक्षण घेतलेच पाहिजे. समाज बांधव निवडून आले पाहिजेत यासाठी समाजाने विचारपूर्वक मतदान केले पाहिजे". समाज बांधबांना एकत्र करून सामाजिक संघटन करा असे आवाहन हंडोरे यांनी शेवटी केले.
संस्थेचे उपाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी उपस्थितांचे व मान्यवरांचे आभार मानले. यावेळी मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहसीन हैदर,निवृत्त आयपीएस अधिकारी सुधाकर सुरवाडकर,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू अक्षय आंबेडकर,कुणाल कांबळे, सोना कांबळे,पत्रकार सुनील शिंदे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष केळवेकर (गुरुजी), सामाजिक कार्यकर्ते एन. के. कांबळे व शशिकांत बनसोडे,प्रसिद्ध कवयित्री व लेखिका आशालता कांबळे, माजी नगरसेविका ज्योस्ना दिघे, अर्चना बच्छाव तसेच संस्थेचे विश्वस्त रत्नाकर रिपोटे, सुनील वाघ, संजय जाधव व निना हरीनामे उपस्थित होते.