मुंबईत खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी पोलिसच ठेवतात खिशात ड्रग्जची पुडी, तेव्हा...
By मनीषा म्हात्रे | Published: September 9, 2024 06:28 AM2024-09-09T06:28:02+5:302024-09-09T06:29:06+5:30
हे सीसीटीव्ही मीडियाला देऊ नये, म्हणून चौकडीने खानला २० लाख रुपयांची लाचही ऑफर केली.
चित्रपट, मालिकांमध्ये अनेकदा पोलिस खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी स्वतःच ड्रग्ज किंवा अन्य पुरावे पेरताना दिसतात. अशाच प्रकारे खारमधील चार पोलिसांनीही एका तबेला मालकाला अडकविण्यासाठी त्याच्या मित्राच्याच खिशात ड्रग्जची पुडी ठेवून बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतले. एवढेच नाही, तर तबेला मालकाविरुद्ध जबाब देण्यासाठी दबावही वाढवला. मात्र, गोठ्यातील सीसीटीव्हीने खाकीमागच्या या चेहऱ्यांचा पर्दाफाश केला आणि अवघ्या काही तासांतच डॅनियल इस्टीबेरो यांची निर्दोष सुटका झाली.
खार परिसरात जवळपास चारशे कोटींच्या प्लॉटची चाळीस वर्षांपासून शाहबाज खान काळजी घेत आहे. याच प्लॉटवर अनेक जण डोळा ठेवून आहेत. खान सांगतात, याच प्लॉटवर हा गोठा आहे. प्लॉट संबंधित काही विकासकाशी वाद सुरू असल्याने विकासकांसह, राजकीय मंडळी ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती घालत होते. सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी गोठ्याच्या एका कोपऱ्यात सीसीटीव्ही बसवले.
डॅनिअल इस्टिरो हा त्यांचा बालपणीचा मित्र. ३० ऑगस्टला खान यांची तब्येत ठीक नसल्याने डॅनिअल गोठ्यात थांबले. सायंकाळी सहाच्या सुमारास साध्या गणवेशात पोहचलेल्या चौकडीने खानबाबत चौकशी करत डॅनिअलची झाडाझडती सुरू केली. त्यांच्या खिशातून २० ग्रॅम ड्रग्जची पुडी काढून त्यांना चौकीत नेले. डॅनियल सांगतात, ते ड्रग्ज माझे नाही. मी निर्दोष आहे, म्हणून मी ओरडत होतो. विनवण्या करत होतो. मात्र, माझे कोणी ऐकले नाही. पोलिस ठाण्याऐवजी एका चौकीत नेत त्रास दिला. आयुष्यात न केलेल्या चुकीसाठी कारागृहात जाणार. आपली सुटका होणार नाही. आपल्या कुटुंबाचे काय होणार? या विचारात असतानाच खानने सीसीटीव्ही मोबाइलवर पाठवले आणि सुटकेचा निःश्वास टाकला. खान यांनी गोठ्यातील सीसीटीव्ही तपासल्यानंतर चार विकृत पोलिसांचा चेहरा समोर आला. त्यांनी तत्काळ हे फुटेज अधिकाऱ्यांना पाठवताच चारही आरोपींचे बिंग फुटले.
हे सीसीटीव्ही मीडियाला देऊ नये, म्हणून चौकडीने खानला २० लाख रुपयांची लाचही ऑफर केली. मात्र, उद्या दुसरा डॅनिअल यांचा टार्गेट होण्यापेक्षा कारवाईसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे व्हिडीओ शेअर केले. अखेर, सीसीटीव्ही समोर येताच मुंबई पोलिसांनी तत्काळ उपनिरीक्षक विश्वनाथ आंबलेसह तीन हवालदारांना निलंबित केले. वाकोला पोलिसांची हद्द असताना देखील त्यांना काहीही माहिती न नेता या चौघांनी असे का आणि कुणाच्या सांगण्यावरून केले, याबाबत पोलिस तपास करत आहेत. मात्र, या घटनेने सर्व स्तरांतून संताप व्यक्त होत आहे.
रक्षकच भक्षक बनल्याने सोशल मीडियावर अनेक टीकास्त्र सुरू झाले. यापूर्वी देखील २०२१ मध्ये पत्नीचा पाठलाग करणारा, तसेच पोलिस खबरी असलेल्या एकाने माटुंगा येथील ३३ वर्षीय तरुणाच्या घरात ड्रग्ज असल्याची टीप देत स्वतः ड्रग्ज आणि रिव्हॉल्व्हर ठेवल्याचे समोर आले होते. शाहू नगर पोलिसांनी या टीपच्या आधारे कारवाई केली. या घटनेचे सीसीटीव्ही समोर आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. त्यापाठोपाठ २०१३ मध्ये जागा मालकाच्या तक्रारीवरून वांद्रे पोलिसांनी कलिना येथील २० वर्षीय तरुणाला खोट्या ड्रग्जच्या गुन्ह्यात अडकवले होते. मात्र, चौकशीत जागा मालक जे. सी. डिसुझाचा हा सर्व प्रताप उघडकीस येताच पोलिसांवरही कारवाई करण्यात आली.
सीसीटीव्ही, तसेच पुरव्यांमुळे ही प्रकरणे उघडकीस आली. मात्र, आजही असे अनेक गुन्हे हे पुरव्याअभावी कारागृहाच्या चौकडीआड बंद होत आहे. मात्र, काही निवडक पोलिसांमुळे मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन होताना दिसत आहे. याला वेळीच चपराक बसणे गरजेचे आहे.