पोलीस घेणार शाळांची ‘झाडाझडती’, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा घेणार आढावा, त्रुटींसाठी व्यवस्थापन जबाबदार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 11:10 AM2024-09-10T11:10:50+5:302024-09-10T11:14:22+5:30
बदलापुरातील लहान मुलींच्या अत्याचाराच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
सीमा महांगडे,लोकमत न्यूज नेटवर्क , मुंबई : बदलापुरातील लहान मुलींच्या अत्याचाराच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. शाळा व्यवस्थापनाला त्यांची अंमलबजावणी करण्यासही सांगितले आहे. पोलिस प्रशासन आणि बालहक्क संघटनेलाही समन्वय साधण्याच्या सूचना केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे.
मुंबईतील प्रत्येक विभागातील शाळांना पोलीस भेट देणार आहेत. तेथील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेणार आहेत. तसेच आवश्यक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी शाळांना पत्रे दिली जात आहेत. मुख्याध्यापकांसह संस्थेला विद्यार्थी सुरक्षिततेसाठी कोणती काळजी घ्यावी, हे सांगत सतर्कचे निर्देशही दिले जात आहेत.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळांमध्ये तक्रारपेट्या असाव्यात, सखी सावित्री समिती असावी अशा उपाययोजना करण्याच्या सूचना आहेत. मात्र, याची अंमलबजावणी होते का, यावर प्रश्नचिन्ह आहे. बदलापूरच्या घटनेनंतर मुंबईतील शिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील शाळांना पत्र पाठवून सुरक्षिततेबद्दल माहिती मागवली आहे. प्रत्येक पोलिस स्थानकाकडून त्यांच्या हद्दीतील शाळा, महाविद्यालयांनाही सूचना केल्या जात असल्याची माहिती शिक्षकांनी दिली. सूचनांची पूर्तताः करण्याबाबत समज दिली जात आहे. अंमलबजावणीत त्रुटी आढळल्यास त्यास शाळा, महाविद्यालय व्यवस्थापन जबाबदार राहील, अशी समजही पोलिसांनी दिली आहे.
शाळा, महाविद्यालयातील कर्मचारी, शिक्षक, सुरक्षारक्षक, शिपाई, सफाई कामगार, स्कूल बसचालक, मदतनीस, कॅन्टीन चालक आदींची शंभर टक्के चारित्र्यपडताळणी करावी.
कर्मचाऱ्यांच्या छायाचित्रासह तपशीलवार माहिती ठेवावी. खोट्या बातम्या पसरणार नाहीत, पसरल्यास तक्रारींची दखल घेतली जाईल याची शाळा व्यवस्थापनाने खबरदारी घ्यावी.
ज्या शाळांमध्ये सहा वर्षाखालील विद्यार्थी शिकण्यास असतील किंवा महाविद्यालयांच्या वसतिगृहे, शौचालय येथे महिला मदतनिसांची नेमणूक करावी.
१) तक्रार किंवा सूचना पेटी लावावी. आठवड्याला व्यवस्थापनाने ती पेटी पोलिस दीदी-पोलिस काका यांच्या उपस्थितीतच उघडावी.
२) पोलीस हेल्पलाईन क्रमांक १०० / ११२, चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक १०९८ हे शाळेच्या दर्शनी भागात लावावेत.
३) शाळा, महाविद्यालय परिसरात सीसीटीव्ही लावावे. त्याचा बॅकअप दोन महिन्यांचा असावा.
४) शाळा, महाविद्यालय व्यवस्थापनाने आठवड्यातून तीनदा सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करावी. फुटेजमध्ये आक्षेपार्ह आढळल्यास त्याची माहिती पोलीस ठाण्यास द्यावी.