Join us

चवळी, गवार १२०, तर पडवळ २०० वर; पितृपक्षात भाज्यांचे दर कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 10:58 AM

पितृपक्ष सुरू होताच भाजीपाला महागला असून हे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तविली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पितृपक्ष सुरू होताच भाजीपाला महागला असून हे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तविली जात आहे. सध्या घाऊक बाजारात सर्वच भाज्या ९० ते १०० रुपये प्रति किलोंवर पोहोचल्या आहेत. दुसरीकडे किरकोळ बाजारातहीभाज्यांच्या किमती दुप्पट झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील बाजारांमध्ये कोणतीही फळभाजी पाव किलो २५ रुपयांना विकली जात आहे. त्यात पाव किलो फुलकोबीसाठी ३० रुपये मोजावे लागत आहेत. किलोभर कोबी घेतला तर १०० रुपयांने दिला जात आहे. मिरचीदेखील पाव किलो ३० रुपयांवर पोचली आहे.

मागणी वाढली-

आवक कमी सध्या राज्यात सर्वत्र परतीच्या पावसाने जोर पकडला असून भाज्यांची काढणी करण्यास शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून मुंबईमध्ये भाजी येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पितृपक्षामधील भाज्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी ही आवक पुरेशी नसल्यामुळे दरांमध्ये वाढ झाली आहे. - राम गायकवाड, भाजी व्यापारी.

पालेभाज्याची जुडी ३० पार-

१) सध्या बाजारात पालेभाज्यांचे दरही चढेच आहेत.

२)  मेथी ३० रुपये जुडी, पालक ४० रुपये जुडी, शेपू २५ रुपये जुडी, तर कोथिंबीर ८० रुपये जुडी या दराने मिळत आहे.

३) तर शेवगा १२० रुपयांवर पोहोचला आहे. चवळी आणि गवार ३० ते ३५ रुपये पाव तर तेवढाच पडवळ घ्यायचा तर चक्क ५० रुपये मोजावे लागत आहेत.

नैवेद्यातील भाज्या खातात भाव ! 

१) पितृपक्षात पूर्वजांना विशेष अन्नाचा नैवेद्य अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली जाते.

२) यासाठी तयार केल्या जाणाऱ्या नैवेद्यामध्ये चणा डाळ वडे, उडीद डाळ वडे, अळू वडी आणि कांदा भजी, पाट वडी, तांदळाची खीर, कढी, दही-भात, कुरडई, पापड असते. त्याचबरोबर भाज्यांमध्ये मेथीची भाजी, बटाटा भजी, लाल भोपळा भाजी, गवार भाजी, भेंडी भाजी आणि कारल्याची भाजी यांचा समावेश होतो. काही ठिकाणी कांदा, लसूण 

३) विरहित स्वयंपाक तर काही ठिकाणी लसूण वापरून स्वयंपाकही केला जातो. 

टॅग्स :मुंबईभाज्याबाजार