पावसाची 'शाळा' उघडणार, २० जूनला सुट्टी संपणार; मुंबईकरांना मिळेल दिलासा; IMDचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 10:01 AM2024-06-18T10:01:58+5:302024-06-18T10:03:03+5:30
गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने दडी मारली आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने दडी मारली आहे. मुंबईची आर्द्रता अधिक नोंदविण्यात येत आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना २० जूननंतर पडणारा पाऊस दिलासा देण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने २० जूननंतर मुंबईत मान्सून पुन्हा सक्रिय होईल, असा अंदाज वर्तविला असून, मान्सून सक्रिय होण्यासाठी आवश्यक वाऱ्याचा वेग कमी असल्याने पाऊस पडत नसल्याचे सांगितले.
साधरणतः मान्सून मुंबईत दाखल होण्याची तारीख ११ जून आहे. यावर्षी मान्सून ९ जून रोजी मुंबईत दाखल झाला. परंतु त्यानंतर त्याने पुन्हा दांडी मारली. पावसाची पडलेली एखाद दुसरी सर वगळता मान्सूनला समाधानकारक कामगिरी करता आली नाही. गेल्या आठवड्यापासून मुंबईच्या वातावरणात सातत्याने बदल नोंदविण्यात येत आहे. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी पावसाचे ढग दाटून येत असले तरी प्रत्यक्षात पावसाचा पत्ता नसल्याने मुंबईकरांचे डोळे पावसाकडे लागून राहिले आहेत. मान्सून सक्रिय होण्यासाठी समुद्रातून वाहून येणारे वारे सक्रिय असावे लागतात. समुद्रातील वारे किंवा त्या वाऱ्याला प्रवाह नसल्यामुळे पाऊस बेपत्ता झाला आहे. २० जूनच्या आसपास यात बदल होईल आणि मान्सून मुंबईमध्ये पुन्हा एकदा सक्रिय होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मंगळवारसाठी अंदाज-
मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (४०-५० किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उत्तर कोंकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (३०-४० किमी प्रतितास वेग) आणि हल्का ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दक्षिण कोंकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.