परतीची जोर'धार'; उडाली दैना, मुंबईतील वाहतुकीवर परिणाम: आजदेखील 'अलर्ट' जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 09:29 AM2024-09-26T09:29:18+5:302024-09-26T09:32:09+5:30
मुंबई शहर आणि उपनगरात बुधवारी दिवसभर बरसलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच दैना उडवली.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात बुधवारी दिवसभर बरसलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच दैना उडवली. सायंकाळी ५ नंतर पावसाने आणखी जोर धरल्याने लोकल, रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. त्यामुळे मुंबईतील वाहतुकीचा वेग काहीसा मंदावला. दरम्यान, पालिकेने मुंबईत गुरुवारी सकाळी ८:३० वाजेपर्यंत 'रेड अलर्ट' जारी केला आहे.
मागील काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने सोमवारपासून मुंबईत पुन्हा कमबॅक केले आहे. मंगळवारी रात्रीपासून यात किंचित वाढ झाली. अंधेरी, कुर्ल्यासह विविध परिसरात मंगळवारी रात्री विजांच्या कडकडाटासह अधून-मधून जोरदार पाऊस सुरू होता. बुधवारी सकाळी किंचित विश्रांती घेतलेल्या पावसाने दुपारी २ नंतर मात्र आपला रौद्र अवतार दाखविण्यास सुरुवात केली.
एलबीएस, डॉ. आंबेडकर मार्ग येथे कोंडी-
१) लालबहादूर शास्त्री मार्गावर कुर्ला डेपो, कुर्ला सिग्नल, शीतल, कमानी सिग्नल, अंधेरी पूर्वेकडील साकीनाका आणि जरीमरी येथे वाहतूककोंडी झाली होती.
२) बीकेसीसह सांताक्रूझ रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक संथगतीने धावत होती.
३) डॉ. आंबडेकर मार्ग, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर पावसाचा मारा कायम होता. रस्ते निसरडे असल्याने वाहतूक संथगतीने होत होती.
४) सायंकाळसह रात्री जोरदार पाऊस असल्याने बस आणि लोकल गाठणाऱ्यांचे मोठे हाल झाले.
सखल भागांत पाणी-
१) पूर्व उपनगरात पावसाचा धुमाकूळ सुरू असतानाच शहरात मात्र शांतता होती. शहरात सायंकाळी ५ नंतर पावसाने जोर धरला होता.
२) मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पडलेल्या पावसामुळे सखल भागांत पाणी साचले होते. लोकल पंधरा मिनिटे विलंबाने धावत असतानाच लोकल प्रवाशांच्या मनस्तापात पाऊस आणखी भर घालत होता.
वाहतूक संथगतीने-
भाटिया बाग, सीएसटी जंक्शन, बीएमसी रोड, जीपीओ, अवतारसिंग बेदी, सायन पुलाच्या उत्तरेकडे जाणारी टी-जंक्शन, वांदे, बीकेसी येथे वाहतूक संथ गतीने सुरू होती.