लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :मुंबई महापालिकेत बऱ्याच कालावधीनंतर १,८४६ लिपिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. काही कालावधीपूर्वी ८०० कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. त्यानंतरची ही आता मोठी भरती आहे. मात्र त्यानंतर नजीकच्या काळात पालिकेत नव्या भरतीची शक्यता नसल्याचे कळते. किमान लिपिक पदांच्या उर्वरित रिक्त पदांसाठी तरी भरती दृष्टीक्षेपात नाही. घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा विभाग, अभियांत्रिकी आदी विभागांनी रिक्त पदे भरण्याची मोहीम सुरू केली तरच नव्या भरतीची अपेक्षा आहे.
पालिकेत सध्या ९०० इंजिनिअर्सची कमतरता आहे. दोन वर्षांपूर्वी 'इंजिनिअर्स डे'च्या दिवशी मुख्यमंत्र्यांसमवेत तत्कालीन पालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल आणि पालिकेतील इंजिनिअर्स संघटनेची बैठक झाली होती. या बैठकीत रिक्त जागा भरण्याचे आश्वासन चहल यांनी दिले होते. मात्र जागा भरल्या गेल्या नाहीत, असे इंजिनिअर्स संघटनेचे साईनाथ राजाध्यक्ष यांनी सांगितले.
१,४५,१११ कर्मचारी चालवतात कारभार-
मुंबई महापालिकेत १२९ खाती असून त्यातील काही खाती अत्यावश्यक सेवेत मोडतात. एक लाख ४५ हजार १११ कर्मचारी पालिकेचा कारभार चालवतात. वाढत्या लोकसंख्येमुळे नागरी सेवा पुरवण्यासाठी वेगवेगळी अतिरिक्त खाती व विभाग पालिकेने सुरू केले आहेत. मात्र, त्यासाठी मनुष्यबळाची भरती मात्र केलेली नाही.