Join us

...तर अंधेरीतील ‘त्या’ पुलाची डागडुजी पालिकेच्या माथी; मनपा कंपनीकडून वसूल करणार खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 10:03 AM

अंधेरी येथील गुंदवली मेट्रो रेल स्थानकाजवळील उड्डाणपुलाखाली एका मोटारीवर बांधकामाचा भाग ४ जुलै रोजी पडला होता.

मुंबई :अंधेरी येथील गुंदवली मेट्रो रेल स्थानकाजवळील उड्डाणपुलाखाली एका मोटारीवर बांधकामाचा भाग ४ जुलै रोजी पडला होता. मुंबई महापालिकेने या घटनेची माहिती या पुलाची देखभाल करणाऱ्या हिरानंदानी कन्स्ट्रक्शन कंपनीला देत डागडुजी करण्यास सांगितले होते. मात्र, अद्याप कोणतीच कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे फार वाट न पाहता महापालिकेकडूनच  पुलाची डागडुजी केली जाईल आणि त्यासाठी आलेला खर्च कंपनीकडून वसूल करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

जवळपास २० वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जोग कन्स्ट्रक्शन कंपनी यांनी अंधेरीतील या पुलाची बांधणी केली होती. यावेळी या पुलाखालील जागा व्यावसायिक वापरासाठी वापरता येईल, असा करारही झाला होता. 

कालांतराने २००५ च्या दरम्यान या पुलाच्या देखभालीची जबाबदारी हिरानंदानी कंपनीकडे आली, मात्र या जागेवरून सुरू असलेल्या न्यायालयीन वादामुळे अद्यापही येथील जागेचा वापर कोणत्याही व्यावसायिक वापरासाठी होत नाही.  

अद्याप कामाला सुरुवात नाही-

४ जुलै रोजी पुलाच्या कोसळलेल्या भागासाठी पालिकेने हिरानंदानी कंपनीला जबाबदार धरत त्यांच्याकडे याबाबत विचारणा केली आहे, तसेच पुलाच्या डागडुजीच्या सूचनाही केल्या आहेत. मात्र, अद्याप त्या कामाला सुरुवात झालेली नाही.

वाहतुकीचे तीनतेरा वाजणार?

अंधेरी येथील गुंदवली मेट्रो रेल स्थानकाजवळील उड्डाणपूल परिसरात वाहतुकीची प्रचंड वर्दळ असते. त्यामुळे डागडुजीसाठी पूल बंद केल्यास वाहतुकीचे तीनतेरा वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने डागडुजी हाती घेतल्यास वाहतूक सुरू असतानाच ते काम करावे लागणार आहे. 

पालिकेकडून दुरुस्तीसाठी निविदा-

या पुलाचा आणखी काही भाग हा अस्थिर असून, त्यासाठी तत्काळ दुरुस्तीची गरज आहे. ‘के’ वॉर्डाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी धोकादायक भागात बॅरिकेड्स लावले असून, यासंदर्भात पूल विभागाला कळवले आहे. दरम्यान, पालिकेकडून पुलाच्या दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, लोकसभा निवडणुकीमुळे या प्रक्रियेला विलंब झाला.

टॅग्स :मुंबईनगर पालिकाअंधेरी