अनधिकृत फेरीवाल्यांचा उच्छाद; परळमध्ये सोसायट्यांना वेढा,ठोस कारवाई करण्याची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 09:32 AM2024-06-27T09:32:53+5:302024-06-27T09:36:05+5:30

रेल्वे स्थानकांबाहेरील पदपथ बळकावणाऱ्या फेरीवाल्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे.

in mumbai the rise of unauthorized hawkers besieged societies in paral demand for action  | अनधिकृत फेरीवाल्यांचा उच्छाद; परळमध्ये सोसायट्यांना वेढा,ठोस कारवाई करण्याची मागणी 

अनधिकृत फेरीवाल्यांचा उच्छाद; परळमध्ये सोसायट्यांना वेढा,ठोस कारवाई करण्याची मागणी 

मुंबई : रेल्वे स्थानकांबाहेरील पदपथ बळकावणाऱ्या फेरीवाल्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिका प्रशासन अधूनमधून अशा फेरीवाल्यांवर कारवाई करीत असली, तरी त्यांना कायमचे हटविण्यात पालिका पूर्णपणे अपयशी ठरली आहे. परळ स्थानकाबाहेरील डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगर सोसायटीच्या बाहेर असणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे तेथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. पालिकेच्या ‘जी दक्षिण’ विभागाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही फेरीवाल्यांचा विळखा सुटत नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

कामगार क्रीडा भवन आणि इंडिया बुल्स सेंटरच्या बाहेर डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगर, परळ रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या महापालिकेच्या हद्दीतील रस्त्यालगत असणाऱ्या सोसायट्यांच्या आवारात काही लोकांनी अनधिकृतपणे स्टॉल्स बांधल्याचे आरोप डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगर सोसायटीतील रहिवाशांनी केला आहे. 

फेरीवाला धोरण कागदावरच -

१) मुंबईत सुमारे लाखभर फेरीवाले रस्त्याच्या कडेला, तसेच पदपथावर दुकाने थाटून व्यवसाय करत आहेत. त्यामुळे वाहतूककोंडी, पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाही उपलब्ध होत नाही. 

२) मुंबई महापालिका दररोज वॉर्डांतील अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करते. मात्र, पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होते. दरम्यान, फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी प्रस्तावित असलेले फेरीवाले धोरण गेली अनेक वर्षे रखडले आहे. त्यातच अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या वाढत असल्याने प्रश्न आणखी बिकट होत आहे.

परळ परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांनी परिसरात उच्छाद मांडला आहे. फेरीवाल्यांवर पालिका अधिकाऱ्यांकडून ठोस कारवाई होत नाही. भविष्यात एखादा गैरप्रकार यामुळे घडल्यास त्याला पालिका प्रशासन जबाबदार राहिल. पालिकेने हा रस्ता फेरीवालामुक्त करून रहिवाशांना दिलासा द्यावा. - जितेंद्र कांबळे, उपाध्यक्ष, माहीम जिल्हा भाजप.

महिला, मुली त्रस्त-

परळ परिसरातील काही फेरीवाले व त्यांच्यातील गुंड प्रवृत्तीच्या महिला, मुलींना तेथून येजा करणे अवघड झाले आहे, असे सोसायटीतील रहिवाशांनी सांगितले. याबाबत २०२२ पासून तक्रारी करण्यात आल्या आहेत. यापुढे काही अप्रिय घटना घडल्यास पालिका त्यास जबाबदार राहील, असा इशाराही रहिवाशांनी दिला आहे.

फेरीवाल्यांमुळे पादचाऱ्यांना चालायला ही रस्ता उरत नाही, अशी तक्रार येथील रहिवाशांनी स्थानिक पोलीस ठाणे आणि पालिकेकडे केली आहे. त्यानंतर पालिकेने फेरीवाल्यांना हटवून तेथे ‘ना-फेरीवाला क्षेत्र’ असा फलक लावला. मात्र, काही दिवसांत परिस्थिती जैसे थे झाली. फलकही हटविण्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितले. मात्र, त्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात आली नाही, असे ते म्हणाले.

Web Title: in mumbai the rise of unauthorized hawkers besieged societies in paral demand for action 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.