Join us

मुंबईत रेल्वे स्टॉल्सवर कायदा धाब्यावर बसवून खाद्यपदार्थांची होते विक्री

By मनोहर कुंभेजकर | Published: December 14, 2022 2:45 PM

मुंबई - रेल्वे स्टॉल्सवर कायदा धाब्यावर बसवून खाद्यपदार्थांची विक्री होते. मुंबई ग्राहक पंचायतीने लक्ष वेधताच अखेर रेल्वे प्रशासनास जाग ...

मुंबई - रेल्वे स्टॉल्सवर कायदा धाब्यावर बसवून खाद्यपदार्थांची विक्री होते. मुंबई ग्राहक पंचायतीने लक्ष वेधताच अखेर रेल्वे प्रशासनास जाग आली."वन स्टेशन वन प्रॉडक्ट" या रेल्वे प्रशासन पुरस्कृत योजनेमधील रेल्वे स्टेशनवर उपलब्ध असणाऱ्या आवेष्टीत खाद्य वस्तूंच्या पाकिटांवर कायद्याने बंधनकारक अशी कोणतीही माहिती प्रदर्शित न करताच अशा वस्तूंची सर्रास विक्री होत असल्याची धक्कादायक माहिती मुंबई ग्राहक पंचायतीच्या  कार्यवाह अनिता खानोलकर यांनी पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक (डिआरएम) नीरज शर्मा यांना लेखी पत्राद्वारे त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. 

 रेल्वे मंत्रालयाने जाहिर केलेली सदर योजना, जागेचा सुयोग्य वापर, महिला बचत गट/छोट्या संस्था यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि स्थानिक वस्तू/कला यांना प्रोत्साहन देणे अशा उदात्त उद्देशाने कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र त्याची अंमलबजावणी पुरेशा गांभिर्याने करण्यात आलेली नाही. अनेक रेल्वे स्थानकांवरील अशा स्टॉलची पाहणी केली असता मुंबई ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांना यामधील ग्राहकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा त्रुटी आढळून आल्या. या स्टॉलवर उपलब्ध असणाऱ्या आवेष्टीत ( पॅक) खाद्यान्नावर आवश्यक माहिती असणारे लेबल लावण्यात आलेले नाहीत. काही वस्तूंवर लेबल असले तरी त्यावरील माहिती अपुरी आहे. आवेष्टित वस्तू नियमांनुसार आवेष्टित वस्तूंवर वस्तूंचे नाव, वजन बनवण्याची आणि खाण्यायोग्य असण्याच्या मुदतीची तारीख, घटक पदार्थ, एमआरपी, एफएसएसएआयच्या नोंदणीचा/परवान्याचा क्रमांक इत्यादी माहिती असणे अनिवार्य आहे. अशी माहिती न देताच सरसकट विक्री होत असल्याचेही अनिता खानोलकर यांनी पत्राद्वारे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणले होते. 

केंद्र सरकारच्या रेल्वे सारख्या एका महत्त्वाच्या उपक्रमानेच केंद्र सरकारनेच केलेले कायदे धाब्यावर बसवून खाद्यपदार्थांची विक्री करावी याबद्दल मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अँड.शिरीष देशपांडे यांनी  आश्चर्य व्यक्त केले. काल दि,१३ डिसेंबर  रोजी झालेल्या विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समिती ( डीआर युयुसीसी)च्या त्रैमासिक सभेमध्ये या समितीच्या सदस्य या नात्याने अनिता खानोलकर यांनी वरील विषय पुन्हा उपस्थित केला असता नीरज शर्मा यांनी सदर आक्षेपांची गांभिर्याने नोंद घेऊन सर्व स्टॉलवरील वस्तूंबाबत आवश्यक ती कायदेशीर पूर्तता करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. 

याबाबत स्थानिक रेल्वे स्टेशनचे मॅनेजर यांच्यावर या स्टॉलचे वेळोवेळी इन्स्पेक्शन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. या सभेमध्ये उपनगरीय रेल्वेतील महिला प्रवाशांच्या इतरही समस्या  खानोलकर यांनी समितीच्या निदर्शनास आणून दिल्या. मुंबई ग्राहक पंचायतीने यापुढेही अशाच प्रकारे ग्राहकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांवर बारकाईने लक्ष ठेवावे आणि प्रशासनाला सतर्क करावे असे सुचवून  नीरज शर्मा यांनी मुंबई ग्राहक पंचायतीचे विशेष आभार व्यक्त केले. 

टॅग्स :मुंबईरेल्वे