Join us

'मेट्रो ३'चा दुसरा टप्पाही सुसाट; शितलादेवी, सिद्धिविनायक स्थानकांची कामं ९९ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2024 9:31 AM

कुलाबा ते सीप्झ या मेट्रो ३ मार्गिकेच्या कामाला गती आली असून, आता दुसऱ्या टप्प्यातील स्थानकांची कामेही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.

मुंबई : कुलाबा ते सीप्झ या मेट्रो ३ मार्गिकेच्या कामाला गती आली असून, आता दुसऱ्या टप्प्यातील स्थानकांची कामेही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यात सुरू होणाऱ्या मार्गावरील शितलादेवी मेट्रो स्थानकाचे काम ९८.८ टक्के, तर सिद्धिविनायक स्थानकाचे काम ९९.४ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये संपूर्ण मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मेट्रो ३ मार्गिकेच्या आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्यातील मार्गिकेवर गाड्यांची तपासणी रिसर्च डिझाइन ॲण्ड स्टॅण्ड्र्स ऑर्गनायझेशन (आरडीएसओ) संस्थेमार्फत पूर्ण करण्यात आली आहे. आता त्यांच्याकडून मेट्रो गाड्या चालविण्याचे प्रमाणपत्र मिळणे बाकी आहे. तर, कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी (सीएमआरएस) पथकाकडून लवकरच पहिल्या टप्प्यातील मार्गाची तपासणी केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे पहिला टप्पा ऑगस्ट अखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. 

स्थापत्य, प्रणालीच्या कामांची पाहणी-

आता दुसऱ्या टप्प्यातील स्थानकांच्या कामांनाही गती देण्यात आली आहे. मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी ‘एमएमआरसी’चे प्रकल्प संचालक सुबोध गुप्ता, प्रणाली विभागाचे संचालक राजीव यांच्यासह शितलादेवी आणि सिद्धिविनायक मेट्रो स्थानकांना भेट दिली. यावेळी त्यांनी स्थानकाच्या स्थापत्य आणि प्रणाली कामाची पाहणी केली. 

२०२५ च्या सुरुवातीला पूर्ण मार्ग सेवेत?

१) सद्य:स्थितीत ‘एमएमआरसी’कडून पहिल्या टप्प्यातील मार्ग सुरू करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. 

२) त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात वरळीपर्यंतच्या मार्गावर वाहतूक सुरू केली जाण्याची शक्यता आहे. तर पुढील वर्षाच्या सुरुवातीला पूर्ण मार्ग सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :मुंबईमेट्रो