‘त्या’ कारचा स्पीड १०० ते १२०? मुलुंड हिट ॲंड रन प्रकरण : भांडुपच्या बारमध्ये दोन वेळा मद्यपान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 09:44 AM2024-07-24T09:44:23+5:302024-07-24T09:50:25+5:30
मुलुंड हिट ॲंड रन प्रकरणातील आरोपी विजय गोरे १०० ते १२० च्या स्पीडने ऑडी कार चालवत असल्याचा अंदाज प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांकडे वर्तवला आहे.
मुंबई :मुलुंड हिट ॲंड रन प्रकरणातील आरोपी विजय गोरे १०० ते १२० च्या स्पीडने ऑडी कार चालवत असल्याचा अंदाज प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांकडे वर्तवला आहे. मात्र, नेमका स्पीड किती होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुसरीकडे, भांडुपच्या बारमध्ये त्याने दोन वेळा मद्यपान केल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून, त्याने सहा लार्ज पेग प्यायल्याची माहितीही पुढे येत आहे.
कांजूरमार्ग परिसरात पत्नीसोबत राहणारा विजय गोरे हा सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीला असून, सध्या वर्कफ्रॉम होममुळे त्याचे घरूनच काम सुरू होते. विजयने रविवारी रात्री ८ वाजता भांडुपच्या बारमध्ये मद्यपान केले. तेथून बाहेर पडल्यानंतर अर्ध्या तासाने तो पुन्हा बारमध्ये गेला. तेथे पुन्हा मद्यपान करत मध्यरात्री २ वाजता तो ठाणे भागात दिसला होता. त्यानंतर, सकाळी ६ वाजेपर्यंत तो नेमका कुठे होता, याबाबत त्याला काही आठवत नसल्याचे तो पोलिसांना सांगत आहे.
दरम्यान, पोलिसांनी मद्यपानाचे बिल त्याच्या गाडीतून ताब्यात घेतले आहे. तो एकटाच असल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर येत आहे. तो तपासाला सहकार्य करत नसल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, मुलुंड पोलिस त्याची कसून चौकशी करत आहेत.
एकाची प्रकृती गंभीर-
१) या अपघातात प्रवासी प्रकाश जाधव (४६), हेमंत चव्हाण (५७) यांच्यासह रिक्षाचालक संतोष वालेकर आणि आकाश जयस्वाल जखमी झाले आहेत.
२) जाधव हा बेस्ट, तर चव्हाण हा रेल्वेत नोकरीला आहे. दोघेही स्टेशनच्या दिशेने येत असताना, हा अपघात घडला. यापैकी वालेकर यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्या पायाला दोन फ्रॅक्चर असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दोन वाजेपर्यंत वाट बघितली-
१) विजय गोरे घरी काहीही न सांगता घराबाहेर पडला. रात्री २ वाजेपर्यंत त्याची वाट बघितली. त्यानंतर झोपी गेले.
२) सकाळी थेट अपघाताची माहिती मिळाल्याचे पत्नीनेही पोलिसांना सांगितले आहे.
‘ते’ गूढ कायम -
आपण कर्जत, खोपोलीच्या दिशेने गेलो. तिथे चहा घेत रिटर्न आलो, असे विजय गोरे सांगत आहे, मात्र नेमका तो कुठे होता?, कुठून आला?, याबाबत काहीही आठवत नसल्याचे तो पोलिसांना सांगत आहे.