नेमेची येतो मग पावसाळा आणि सोबत खड्डेही
By सीमा महांगडे | Published: July 13, 2024 10:00 AM2024-07-13T10:00:15+5:302024-07-13T10:02:27+5:30
महापालिकेने खड्ड्यांसाठी वापरलेले कुठलेच तंत्रज्ञान प्रभावी न ठरल्याने पावसाळ्यात पुन्हा खड्ड्यांचा प्रश्न कायम आहे.
सीमा महांगडे, मुंबई : महापालिकेने खड्ड्यांसाठी वापरलेले कुठलेच तंत्रज्ञान प्रभावी न ठरल्याने पावसाळ्यात पुन्हा खड्ड्यांचा प्रश्न कायम आहे. बऱ्याचदा तर रस्त्यावरील खड्ड्यांवर डांबराची खडी आणि वाळूसदृश्य मिश्रणामुळे रस्त्यांची अवस्था आणखी बिकट झाल्याच्या तक्रारी नागरिक करतात. महत्त्वाचे म्हणजे यावरून दुचाकी घसरण्याच्या घटना घडतात. मग पालिकेकडून दावा केल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर नेमका होतो कुठे व कसा? हा प्रश्न पडतो.
पालिकेच्या रस्ते विभागाने या आधी रॅपिड हार्डनिंग काँक्रीट आणि रिॲक्टिव्ह अस्फाल्ट अशा दोन पद्धतीने खड्डे भरण्याचा प्रयत्न केला. तरीही मागच्या वर्षी खड्डे पडले. त्यामुळे यंदा द्रुतगती मार्गावर सिमेंट काँक्रीट रस्त्याचे मजबुतीकरण करण्यासाठी जिओ-पॉलिमर तंत्रज्ञानाचा प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्यात येत आहे. सिमेंट काँक्रीटचा रस्ता खराब झाला असेल तर संपूर्ण पृष्ठभाग न काढता खड्ड्यांमध्ये जिओ पॉलिमर काँक्रीट भरले जाते आणि ते मूळ सिमेंट काँक्रीटसमवेत एकजीव होते. या पद्धतीने खड्डे भरल्यानंतर अवघ्या २ तासांत रस्ता वाहतुकीसाठी खुला करता येऊ शकतो. तर डांबरी रस्त्याच्या पृष्ठभागावर आवरण टाकून रस्त्याचे मजबुतीकरण करण्यासाठी ‘मायक्रो-सर्फेसिंग’ या नवीन तंत्रज्ञानाचा प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्यात येत आहे. खड्डे संबंधित कंत्राटदारांकडून विनाशुल्क भरून घेण्यात येत आहेत, जेणेकरून रस्ते वाहतूक योग्य होण्यास मदत होत असल्याचा दावा पालिका करत आहे.
मास्टिक कुकरचाही वापर -
१) खड्डे बुजवण्यासाठी विभागनिहाय प्रत्येकी तीन याप्रमाणे एकूण ७२ मास्टिक कुकर उपलब्ध ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रत्येक विभागात ९ मीटरपेक्षा अधिक रूंदीच्या रस्त्यासाठी २ मास्टिक कुकर आणि ९ मीटरपेक्षा कमी रूंदीच्या रस्त्यांसाठी १ मास्टिक कुकर याप्रमाणे २४ विभागांमध्ये ७२ मास्टिक कुकर वापरण्यात येणार आहेत.
२) सर्व मास्टिक कुकर संयंत्रांवर जीपीएस लावून त्याआधारे संयंत्रांच्या उपलब्धततेवर लक्ष ठेवले जाईल. याची जबाबदारी विभागीय पातळीवर असणार आहे. मात्र अद्याप मुंबईच्या रस्त्यांवर ७२ ठिकाणी मास्टिक कुकर दिसलेले नाहीत.