भटक्या कुत्र्यांची दहशत; ३,५०८ जणांवर हल्ला, प्राणी मालकांचे जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 10:44 AM2024-07-02T10:44:37+5:302024-07-02T10:46:05+5:30

भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, त्यांच्यावर आवर घालण्यात मुंबई महापालिकेला  म्हणावे तसे यश मिळालेले नाही.

in mumbai the terror of stray dogs 3508 people attacked animal owners neglecting their responsibilities | भटक्या कुत्र्यांची दहशत; ३,५०८ जणांवर हल्ला, प्राणी मालकांचे जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष

भटक्या कुत्र्यांची दहशत; ३,५०८ जणांवर हल्ला, प्राणी मालकांचे जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष

मुंबई : भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, त्यांच्यावर आवर घालण्यात मुंबई महापालिकेला  म्हणावे तसे यश मिळालेले नाही. २०२० ते २०२३ या तीन वर्षांत कुत्र्यांनी चावा घेण्याच्या ३ हजार ५०८ घटना घडल्या. चावा  घेण्यात एका पाळीव कुत्र्याचाही   समावेश आहे. उर्वरित घटनांमधे भटक्या कुत्र्यांनी चावे घेतले आहेत. २०२० साली ६१० जणांना कुत्रे चावले होते. २०२३ मध्ये यात जवळपास दुप्पट वाढ झाली आहे.

१९,१५८ जणांना दिले परवाने-

१) पालिकेतर्फे कुत्रे पाळण्यासाठी परवाने दिले जातात. याचे प्रमाणही वाढले आहे. २०२०-२३ या तीन वर्षांच्या कालावधीत पालिकेतर्फे पाळीव कुत्र्यांसाठी १९ हजार १५८ परवाने देण्यात आले.
 
२) २०२० मध्ये २,५८१ परवाने देण्यात आले होते. २०२२ मध्ये हा आकडा  ६६०५ एवढा झाला. पाळीव प्राणी पाळायचे असतील तर पालिकेचे त्याहीसाठी काही नियम आहेत. 

३) मालकांनी कोणती काळजी घ्यावी हे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाळीव प्राण्याच्या मालकांवर म्हणावी तशी कारवाई झालेली नाही. आतापर्यंत पाळीव प्राण्यांच्या केवळ ४९ मालकांना नोटीस देण्यात आली आहे.

प्राणी मालकांचे जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष -

पाळीव प्राण्यांचे मालक भारतीय प्राणी कल्याण मंडळाने निर्धारित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांच्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात, याकडे द यंग व्हिसल ब्लोअर्स फाउंडेशनचे जितेंद्र घाडगे यांनी लक्ष वेधले. महापालिकेच्या देवनार पशुवधगृहाच्या कार्यालयातून माहितीच्या अधिकाराखाली त्यांनी कुत्रे चावण्याच्या घटनांची आकडेवारी मागवली होती.

रहिवाशांवर हल्ले-

कुत्र्यांच्या संख्येला नियंत्रित करण्यासाठी पालिका नसबंदीची मोहीम चालवते, तरीही संख्या वाढतच आहे. यावर बोलताना गिरगावचे रहिवासी नील शाह यांनी पालिका नसबंदीच्या प्रयत्नांवर अपुरे लक्ष केंद्रित करत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. गेल्या पाच वर्षांमध्ये रात्रीच्या वेळी कुत्र्यांना खायला घालणाऱ्यांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली आहे. योग्य काळजी आणि व्यवस्थापनाअभावी भटक्या कुत्र्यांच्या संख्येत अनियंत्रित वाढ झाल्यामुळे रहिवाशांवर हल्ले होण्याचा धोका वाढतो. 

Web Title: in mumbai the terror of stray dogs 3508 people attacked animal owners neglecting their responsibilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.