Join us  

गणेशोत्सवातील गीतांचा ट्रेंड अलीकडच्या काळात ओसरला! सोशल मीडियाचा गणेशगीतांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2024 10:07 AM

अलीकडच्या काळात गणेशोत्सवाच्या काळात येणाऱ्या नवीन गीतांचा ट्रेंड काहीसा ओसरला असून, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गीतांचा बोलबाला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अलीकडच्या काळात गणेशोत्सवाच्या काळात येणाऱ्या नवीन गीतांचा ट्रेंड काहीसा ओसरला असून, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गीतांचा बोलबाला आहे. 

आजही भारतरत्न लता मंगेशकर यांच्या आवाजातील अष्टविनायक गीतांसोबतच ‘ओंकार स्वरूपा...’,‘नमिला गणपती...’, ‘पार्वतीच्या बाळा...’, ‘अशी चिक मोत्यांची माळ...’, ‘सनईचा सूर कसा...’, ‘बंधू येईल माहेरी...’, आदी गाजलेली गणेशगीतेच गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करत आहेत. जुन्या गाण्यांना मागे टाकत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या नवीन गणेशगीतांची उणीव भासत आहे.

सोशल मीडियाचा फार मोठा फटका गणेशगीतांना बसला आहे. आज जसा स्मार्ट फोनमुळे प्रत्येकजण फोटोग्राफर बनला आहे, तसा सोशल मीडिया आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे संगीताचे ज्ञान नसलेलेही गायक-संगीतकार बनत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. आज एखादे दर्जेदार गाणे बनवायचे झाल्यास बजेट लाख रुपयांच्याही पुढे जाते, पण २५ हजारांमध्येही गाणी बनवून सोशल मीडियाद्वारे पब्लिसिटी केली जात आहेत. ही गाणी फार काळ स्मरणात राहत नाहीत. यंदा आलेली गाणी पुढल्या वर्षी वाजतीलच याची खात्री नाही. गाण्यांचे लाईफ कमी झाले आहे.

मंडळांची गणेशगीते...

मागील काही वर्षांमध्ये मुंबईतील गणेशोत्सव मंडळांचे प्रस्थ वाढले आहे. मंडळांनी आपापल्या बाप्पाला ‘राजा-महाराजा’ची उपमा देत त्यांच्यावर स्वतंत्र गीतरचना केल्या आहेत. यातही गणेशोत्सव मंडळांमध्ये वेगळ्या प्रकारची स्पर्धा दिसते.

सीडी-कॅसेट्ससारखी आज गाण्याला रिकव्हरी नसल्याने कोणताही निर्माता फार खर्च करायला धजावत नाही. कमी खर्चात गाणी बनवली जात असल्याने पूर्वीसारखा दर्जा नसतो. युट्यूबवर लाखभर व्ह्यूजवर केवळ २५० रुपये मिळतात. त्यामुळे गाण्यावर जास्त खर्च परवडत नाही.  सोशल मीडियामुळे गाणे वेगात पोहोचते, पण ते तितक्याच वेगात विस्मृतीतही जात आहे.- जयेश वीरा, संचालक, कृणाल म्युझिक

संगीताची जाण असलेल्यांची उणीव-

संगीतकार निर्मल मुखर्जी आणि अरविंद हळदीपूर यांनी ‘अरविंद-निर्मल’ या नावाने अनेक गाणी संगीतबद्ध केली आहेत. त्यांचे ‘अशी चिक मोत्याची माळ...’, हे गाणे आजही पॉप्युलर आहे. नवीन गाण्यांबाबत अरविंद हळदीपूर ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, संगीताची जाण असलेल्या निर्मात्यांची उणीव भासते. एखादे गाणे ऐकताच त्यावर दुसऱ्या संगीतकाराची छाप जाणवते. 

रसिकांच्या मनात रुंजी घालणारी गाणी... 

१) काहीतरी स्वत:चे क्रीएट करण्याऐवजी झटपट प्रसिद्ध होण्यासाठी कॉपी करण्याचा प्रयत्न केला जातो. आम्ही शब्दांना घेऊन चाली रचायचो. 

२) आज चाल बनवून नंतर शब्द लिहायला सांगितले जाते. अगोदर शब्दरचना केल्यास त्यातील अर्थ संगीतकाराला समजतो. 

३) पहिले शब्द, दुसरे रीदम आणि मग शेवटी ट्यून असे गाणे बनवण्याची योग्य पद्धत आहे. 

४) ती बदलल्याने पूर्वीसारखी रसिकांच्या मनात रुंजी घालणारी गाणी बनत नसल्याचेही हळदीपूर म्हणाले.

टॅग्स :मुंबईगणेशोत्सव