Join us

कंत्राटदारांचे सहकार्य नाही, खड्डे बुजवायचे कसे? इंजिनीअर्सना नोटीस दिल्याने युनियन नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 9:35 AM

मुंबई महापालिका प्रशासनाने बजावलेल्या नोटिशीमुळे इंजिनीअर्सची संघटना नाराज झाली आहे. 

मुंबई : खड्डे बुजवण्यात दिरंगाई केल्याचा  ठपका ठेवत काही सब इंजिनीअर्सना (दुय्यम अभियंते) मुंबई महापालिका प्रशासनाने बजावलेल्या नोटिशीमुळे इंजिनीअर्सची संघटना नाराज झाली आहे.    इंजिनीअर्स १८ तास काम करून खड्डे बुजवण्याची कामे करत आहेत, परंतु मुसळधार पावसाने खड्डे बुजवण्याच्या  कामात प्रचंड अडथळा निर्माण होत आहे. तसेच, कंत्राटदार वेळेवर मालाचा आणि मजुरांचा पुरवठा करत नाही, अशा प्रतिकूल परिस्थितीत काम करूनही प्रशासनाने नोटिसा  पाठवल्यामुळे इंजिनीअर्स नाउमेद होण्याची शक्यता आहे, अशी भावना बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनीअर्स युनियनने आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.  

युनियनचे कार्याध्यक्ष साईनाथ राजाध्यक्ष आणि जनरल सेक्रेटरी यशवंत धुरी यांनी खड्डे बुजवताना इंजिनीअर्सना येणाऱ्या अडचणींचा  पाढाच पत्रात वाचला. 

खड्डे शोधणे आणि ते तत्काळ बुजवण्यासाठी पालिकेने यंदा प्रत्येक वॉर्डात सब इंजिनीअरची नियुक्ती केली आहे. खड्डेप्रकरणी तत्काळ कार्यवाही करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यात कसूर झाल्यास कारवाईचा इशारा प्रशासनाने याआधीच दिला आहे. 

काही दिवसांपूर्वी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल  १३ इंजिनीअर्सना नोटिसा बजावण्यात आल्या. त्यामुळे युनियनने नाराजी व्यक्त केली. सब  इंजिनीअर्स प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कामे करत असून, त्यांच्या काय अडचणी  आहेत, हे आयुक्तांनी समजून घेतले  पाहिजे. जुलैमध्ये दरवर्षी मुसळधार पाऊस होतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर खड्डे पडतात. यंदाही तेच चित्र आहे. बऱ्याच ठिकाणांचे रस्ते काँक्रिटीकरण झाले आहेत, काही ठिकाणी मास्टिक अस्फाल्टचा वापर करून रस्ते सुस्थितीत ठेवण्यात आले आहेत, याकडे युनियनने लक्ष वेधले. 

मेट्रोच्या कामांमुळे चाळण-

१) मेट्रो रेल्वेच्या कामांमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. 

२) या रस्त्यांच्या डागडुजीची जबाबदारी संबंधित प्राधिकरणाची आहे. ‘ना हरकत’ देताना प्राधिकरणाला तशी अट घातली आहे. मात्र, ती पाळली जात नाही. 

३) मेट्रोचे कंत्राटदार खड्डे बुजवत नाहीत.  त्यामुळे मेट्रोची कामे सुरू असलेल्या ठिकाणचे खड्डे पालिकेलाच बुजवावे लागत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीए आणि  एमएमआरडीएच्या अखत्यारीतील रस्त्यांची डागडुजीही पालिकेलाच करावी लागते, याकडेही लक्ष वेधण्यात आले. 

दोन पाळ्यांमध्ये इंजिनीअर्सची नियुक्ती करा-

१) मागील आठवड्यात, तर मुसळधार पावसामुळे खड्डे भरणे शक्यच नव्हते. साधारण: श्रावणात पावसाचा जोर कमी झाल्यावर खड्डे भरले जातात. एकूणच प्रशासनाने वस्तुस्थिती  लक्षात घेतली  पाहिजे. प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या इंजिनीअर्सच्या अडचणी समजावून घेण्यासाठी  आयुक्तांनी त्यांच्यासोबत  बैठक घ्यावी, अशी विनंती युनियनने केली आहे.  

२) सध्या खड्डे भरण्याच्या कामासाठी इंजिनीअर्सना १८ तास काम करावे लागत आहे. शनिवारी आणि रविवारीही ते कामावर असतात.  इंजिनीअर्सची नियुक्ती  दोन पाळ्यांमध्ये करावी, अशीही मागणी युनियनची आहे.

 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाखड्डे