Join us

मुलगा, सून सांभाळत नाही; 'या' हेल्पलाइनवर साधा संपर्क; ५ महिन्यांत ६० जणांना मिळाली मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 10:52 AM

भारतीय संस्कृतीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना आदराचे स्थान आहे. ज्येष्ठांच्या हिताची काळजी घेणे, हे राज्य सरकारही आपले सामाजिक कर्तव्य मानते.

मुंबई : भारतीय संस्कृतीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना आदराचे स्थान आहे. ज्येष्ठांच्या हिताची काळजी घेणे, हे राज्य सरकारही आपले सामाजिक कर्तव्य मानते. म्हणून ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या पुरुषांना आणि महिलांना 'ज्येष्ठ नागरिक' दर्जा दिला जातो. ज्येष्ठ नागरिकांना सहाय्य करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारतर्फे विविध योजना राबविल्या जातात. तसेच ज्येष्ठांच्या मदतीसाठी १४५६७ या क्रमांकाची हेल्पलाइन सुद्धा चालविली जाते.

वृद्धांच्या संख्येमध्ये वेगाने वाढ होत आहे. त्यांच्या अडचणी सोडविणे व गरजा भागवण्यासाठी केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने १४५६७ या क्रमांक राष्ट्रीय हेल्पलाइन सुरू केली आहे. ही हेल्पलाइन पूर्णपणे निशुल्क आहे. कुठल्याही प्रकारची समस्या उद्भवल्यास ज्येष्ठांना सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत आठवड्यांतील सर्व दिवस या हेल्पलाइनवर मदत मागता येणार आहे, असे उपजिल्हाधिकारी कार्यालयाने सांगितले

या' कारणांसाठी मिळेल मदत-

हेल्पलाइन जनसेवा फाउंडेशन, पुणेतर्फे चालवण्यात येत आहे.हेल्पलाइनमार्फत आरोग्य जागरूकता, निदान, उपचार निवारा,वृद्धाश्रम, डे-केअर सेंटर, पोषणविषयक, ज्येष्ठांसाठीचे उत्पादने, सांस्कृतिक, आध्यात्मिक, कला, करमणूक आदींची माहितीदिली जाते. त्याचप्रमाणे कायदेविषयक, विवाद निराकरण,आर्थिक, पेन्शन संबंधित सरकारी योजना याचे मार्गदर्शन केले जाते.

पाच महिन्यांत ६० जणांचा संपर्क-

गेल्या पाच महिन्यांत अनेक समस्यांसाठी ज्येष्ठांनी मदतीसाठी हेल्पलाइनवर संपर्क साधला. त्यापैकी मुंबई आणि उपनगरातील जवळपास ६० ज्येष्ठ नागरिकांनी संपर्क साधला. या हेल्पलाइनच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना सहकार्य करण्यासाठी विविध शासकीय यंत्रणा, पोलिस प्रशासन, स्वयंसेवक तसेच विविध सेवाभावी संस्थादेखील सातत्याने कार्यरत आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी आवश्यक असल्यास निर्धास्तपणे मदत मागावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.

टॅग्स :मुंबई