Join us

दुचाकीचे हॅण्डल लॉक, तरी होतेय चोरी; पाच महिन्यांत वाहन चोरीचे १०८४ गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 10:24 AM

गेल्या पाच महिन्यांत मुंबईत वाहनचोरीसंबंधित एक हजार ८४ गुन्हे नोंद झाले आहेत.

मुंबई :मुंबईत दिवसागणिक वाहनचोरीच्या गुन्ह्यांत मोठी वाढ होत असून, या गुन्ह्यांची उकलसुद्धा निम्म्यावर असल्याचे मुंबई पोलिसांकडे दाखल होत असलेल्या गुन्ह्यांच्या आकडेवारीतून समोर आले आहे. गेल्या पाच महिन्यांत मुंबईत वाहनचोरीसंबंधित एक हजार ८४ गुन्हे नोंद झाले आहेत. यापैकी निम्म्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. हँडल लॉक असले तरी चोरटे सफाईने दुचाकी चोरत असल्याचे दिसून येत आहे.

मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते मे दरम्यान मुंबईत एकूण २३ हजार १३६ गुन्ह्यांची नोंद झाली. त्यापैकी १५ हजार ९१० गुन्ह्यांची उकल झाली. यामध्ये दिवसाला सात ते आठ वाहनचोरीच्या घटना घडत असून, त्यामुळे मुंबईकरांची डोकेदुखी वाढत आहे. या पाच महिन्यांत मुंबईत वाहनचोरीचे एकूण १०८४ गुन्हे नोंद झाले. त्यापैकी ५५७ गुन्ह्यांची उकल झाली. गेल्या वर्षी याच पाच महिन्यांत मुंबईत १ हजार ४५ गुन्ह्यांची नोंद झाली होती.

मुंबई पोलिसांनी २०१८ मध्ये मोटार वाहनचोरीविरोधी पथक बंद करण्याचा निर्णय घेतला. हे पथक मालमत्ता कक्षात विलीन करण्यात आले आहे. मुंबईतून चोरी होणाऱ्या बहुतांश गाड्या गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटकमध्ये नेण्यात येतात. तसेच मुख्यत्वे करून चोरलेल्या गाड्यांचाच गुन्हे करण्यासाठी वापर केला जातो. 

भंगारात पार्टची विक्री-

१) रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकी चोरून काही टोळी त्यांचे पार्टची मुंबईसह अन्य शहरांत विक्री करतात. मुंबईतही बऱ्याच गॅरेजमध्ये याची कमी भावात खरेदी करतात, तर काही जण भंगारातील दुचाकींचे इंजिन नंबर लावून त्यांची विक्री करतात.

२) भंगारामध्ये निघणाऱ्या दुचाकी दोन ते पाच हजारांमध्ये कागदपत्रांसह ग्राहकांकडून खरेदी करायचे. त्यानंतर त्याच बनावटीची दुचाकी शोधून चोरी करायची. 

३) अशा टोळ्यांवर मुंबई पोलिसांकड़ून वेळोवेळी कारवाई करण्यात येत आहे, तर काही ठग बनावट क्रमांक लावून या दुचाकीची सोशल मीडियावर देखील विक्री करताना दिसून आले.

१०-१५ गुन्ह्यांचा लागतो छडा-

एखादी वाहनचोरांची टोळी पकडल्यास किमान १० ते १५ गुन्ह्यांची उकल होत असल्याचे पोलिस कारवाईतून दिसून आले आहे. त्यामुळे वाहनचोरीच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी वेगळ्या पथकाची आवश्यकता असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीपोलिसचोरी