मुंबईत औषधाच्या दुकानांतून फार्मासिस्ट गायब? अन्न व औषध प्रशासनाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 10:27 AM2024-02-05T10:27:28+5:302024-02-05T10:30:00+5:30
१६५ दुकानांमध्ये फार्मासिस्टच नाहीत.
मुंबई : शहरातील अनेक मेडिकल स्टोअरमध्ये अर्धवेळच फार्मासिस्ट असल्याचे उघडकीस आले आहे. तसेच अनेक ठिकाणी काही वेळापुरतेच फार्मासिस्ट मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध असतात. त्यामुळे मेडिकल स्टोअर्समध्ये असलेल्या दहावी व बारावी शिकलेल्या मुलांकडूनच रुग्णांना औषधे देण्यात येत आहेत. अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शहर उपनगरातील सुमारे १६५ औषध विक्री दुकानांमध्ये फार्मासिस्ट नसल्याचे दिसून आले आहे.
एफडीएने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व-पश्चिम उपनगरातील सुमारे १६५ औषध विक्री दुकानांमध्ये फार्मासिस्ट आढळला नसल्याचे दिसले आहे. यात सर्वाधिक प्रमाण पश्चिम उपनगरातील विभागांचे आहे. फार्मासिस्टचे प्रमाणपत्र त्याच्या छायाचित्रासह स्टोअर्समध्ये दर्शनी भागात लावावे. हे अनेकदा कोपऱ्यात लावलेले असते. औषधांच्या बिलावर फार्मासिस्टची सही असणे गरजेचे आहे.
फार्मासिस्टशिवाय परवाना मिळत नाही :
प्रमाणपत्र असल्याशिवाय मेडिकल स्टोअर्स सुरू करण्याचा परवाना मिळत नाही. औषधनिर्माण शास्त्रातील पदवी असलेल्या फार्मासिस्टने औषधांच्या दुकानांमध्ये उपस्थित असणे बंधनकारक आहे, मात्र अनेकदा पूर्णवेळ फार्मासिस्ट आढळून येत नाही. अनेक मेडिकल स्टोअर्समध्ये ८ ते १२ तास फार्मासिस्ट काम करतात व निघून जातात. उरलेल्या वेळेत मेडिकल स्टोअर्समध्ये फार्मासिस्ट नसतात. अनेक मेडिकल स्टोअर्समध्ये रात्रीच्या वेळी फार्मासिस्ट उपलब्ध नसतात. औषधांची माहिती तसेच ज्ञान नसलेल्या अप्रशिक्षित व्यक्तीने जर चुकीची औषधे दिली, तर त्यामुळे एखाद्याच्या जीवाला धोका निर्माण होतो.