Join us  

ताप आलाय, संसर्ग तर नाही ना ! शहरात मलेरिया, डेंग्यू रुग्णांची संख्या लक्षणीय 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 10:51 AM

पावसाचा जोर ओसरला तरी पावसाळी आजारांची संख्या काही कमी झालेली नाही. श

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पावसाचा जोर ओसरला तरी पावसाळी आजारांची संख्या काही कमी झालेली नाही. शहरात मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. हे दोन्ही आजार डासांमुळे होतात. या आजारांमध्ये थंडीताप, सर्दी, खोकला आणि सांधेदुखी ही सर्वसामान्य लक्षणे दिसतात. मात्र काही रुग्णांमध्ये हीच लक्षणे असली तरी वैद्यकीय चाचणीमध्ये कोणत्याही आजाराचे निदान होत नसल्याने नागरिक कमालीचे अस्वस्थ होत आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मतानुसार  व्हायरल (विषाणूंचा) संसर्ग  असल्याचे सांगितले जात आहे. 

गेल्या तीन ते चार महिन्यांपासून काही रुग्णांना डेंग्यू, मलेरियाचा त्रास होत आहे. त्यामुळे कोणत्याही नागरिकास थंडी, ताप, सर्दी, खोकला आणि सांधेदुखी अशी लक्षणे आढळल्यास  डॉक्टरांकडे रक्ताची चाचणी करून घ्यावी, अशी मागणी रुग्ण करत आहेत. मात्र अनेकदा डॉक्टर एक-दोन दिवस थांबा, असा सल्ला त्यांना देतात.  

..अशी घ्या काळजी

नागरिकांनी आपल्या घरामध्ये, घराच्या आजूबाजूला, इमारतींच्या परिसरात कुठेही पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी. साचलेल्या पाण्यातच डासांची मादी अंडी घालते. डासांची उत्पत्तीस्थळे तयार होतात. साचलेले पाणी आढळल्यास त्याचा तत्काळ निचरा करावा. टायर, नारळाच्या करवंट्या, प्लॅस्टिकच्या बाटल्या व झाकण, झाडांच्या कुंड्या, फ्रीजचा डिफ्रॉस्ट ट्रे यामध्ये पाणी साचून राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. फेंगशुई, मनी प्लांटसारख्या शोभेच्या रोपट्यांचे पाणी नियमित बदलावे. दिवसा-रात्री झोपताना मच्छरदाणी किंवा डास प्रतिबंधात्मक औषधांचा वापर करावा.

अंगदुखीमुळे बेजार-

काही रुग्णांमध्ये थंडी, ताप, खोकला, सर्दी अशी सर्वसामान्य लक्षणे दिसून येतात. मात्र, दोन ते तीन दिवसांनी रक्तचाचणी केल्यानंतर कुठल्याही आजाराचे निदान होत नाही. डॉक्टर व्हायरलची साथ असल्याचे सांगून लक्षणानुसार उपचार करत आहेत. विशेष म्हणजे, तीन-चार दिवसांत हा आजार बरा होत असला तरी अंगदुखीमुळे मात्र बाधित रुग्ण हैराण होत असल्याचे चित्र आहे. 

आरोग्याबाबत नागरिक सजग झाले आहेत. एक दिवसात ताप बरा झाला नाही तर ते वैद्यकीय सल्ला घेतात. ही गोष्ट चांगली आहे. मात्र काहीवेळा ते रक्तचाचणीसाठी तगादासुद्धा लावतात. कारण पावसाळी आजाराची भीती त्यांच्या डोक्यात असते. अनेकवेळा लक्षणे बघून आम्ही त्याच्यावर उपचार करतो. अनेकवेळा नागरिक रक्ताच्या चाचण्या करून घेतात. मात्र त्यामध्ये कोणत्याही आजराचे निदान होत नाही. कारण हा व्हायरल संसर्ग असतो तो अनेकदा दोन दिवसांत बरा होतो. - डॉ. अनिल पाचनेकर, फिजिशियन, धारावी

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाआरोग्यमलेरिया