‘नर्सिंग’साठी यंदा विद्यार्थ्यांच्या उड्या; ८,४५३ प्रवेश निश्चित, संस्थांच्या पातळीवर आता प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 10:26 AM2024-09-20T10:26:12+5:302024-09-20T10:27:06+5:30

नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला यंदा विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तिसऱ्या फेरीअखेर राज्यातील नर्सिंग कॉलेजांतील ७९ टक्के जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले.

in mumbai this year students jump for nursing about 8,453 admissions confirmed process now at institute level | ‘नर्सिंग’साठी यंदा विद्यार्थ्यांच्या उड्या; ८,४५३ प्रवेश निश्चित, संस्थांच्या पातळीवर आता प्रक्रिया

‘नर्सिंग’साठी यंदा विद्यार्थ्यांच्या उड्या; ८,४५३ प्रवेश निश्चित, संस्थांच्या पातळीवर आता प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला यंदा विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तिसऱ्या फेरीअखेर राज्यातील नर्सिंग कॉलेजांतील ७९ टक्के जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. जवळपास ८,४५३ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. आता संस्थात्मक पातळीवरील प्रवेश प्रक्रियेत आणखी प्रवेश होण्याची शक्यता आहे. 

सीईटी सेलने बीएससी नर्सिंग प्रवेशासाठी गेल्या वर्षापासून स्वतंत्र सीईटी घेण्याचा निर्णय घेतला. यंदा ही परीक्षा २८ मे रोजी घेण्यात आली. या सीईटी परीक्षेचा निकाल १९ जूनला जाहीर झाला होता. दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नर्सिंग अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा जवळपास दुप्पट विद्यार्थ्यांनी दिली. यंदा राज्यभरातून तब्बल ५० हजार २१७ विद्यार्थ्यांनी नर्सिंग अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा दिली. यामध्ये ३७ हजार ५२४ मुली, १२ हजार ६९१ मुलांचा समावेश होता. गेल्या वर्षी याच अभ्यासक्रमासाठी २७ हजार ९८६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. 

या वर्षी वाढल्या जागा-

नर्सिंगच्या जागांमध्ये यंदा भरघोस वाढ झाली आहे. नर्सिंगसाठी गेल्या वर्षी ७,३६० जागा होत्या. त्यावेळी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ६,६२० होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जागांमध्ये ४९ टक्क्यांनी म्हणजेच ३,६१० ने वाढल्या आहेत. 

प्रवेशाची चौथी फेरी सुरू-

राज्यामध्ये बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठीची पाच सरकारी कॉलेजेस आहेत. यामध्ये २५० जागा आहेत. आतापर्यंत २३४ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. सरकारी कॉलेजांमध्ये आता केवळ १६ जागांवरील प्रवेश बाकी आहेत.

खासगी कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी १०,७२० जागा उपलब्ध आहेत. यातील ८,४५३ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. सध्या सीईटी सेलकडून चौथी फेरी सुरू केली आहे. त्यानंतर उर्वरित जागांवर संस्थात्मक पातळीवर प्रवेश होणार आहेत. यापुढील फेऱ्यांमध्ये सर्वच जागा भरल्या जाण्याची शक्यता आहे.

Web Title: in mumbai this year students jump for nursing about 8,453 admissions confirmed process now at institute level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.