लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : व्यावसायिक - औद्योगिक संकुलासह मोठ्या वसाहती असलेल्या मुंबई महापालिकेच्या के-पूर्व प्रभागात दररोज लाखो लीटर पाणी वाया जात असून रस्त्यावर वाहणाऱ्या या पाण्याच्या सततच्या प्रवाहामुळे पादचारी आणि वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाच्या उदासीनतेबाबत परिसरात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
अंधेरी-कुर्ला रोडला जोडलेल्या औद्योगिक क्षेत्रातील महाकाली गुंफा रोडच्या मुख्य जंक्शनवर मोठ्या जलवाहिनीच्या मेन चेंबरमध्ये ही पाणी गळती सुरू आहे. विशेष म्हणजे गेल्या दहा दिवसांपासून दुपारी चार वाजेपासून ते रात्री उशिरापर्यंत लाखो लीटर पाणी वाहून वाया जात आहे. मात्र, पाणीपुरवठा विभागाने वाहिनीची अद्याप दुरुस्ती न केल्याने शुद्ध पाणी संपूर्ण परिसरात पसरते. सायंकाळच्या वेळेत पादचारी आणि वाहनचालकांची वर्दळ या रस्त्यावर असते. त्यांना रस्त्यावरील या प्रवाहाचा मोठा फटका बसतो. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
‘तातडीने दुरूस्ती करा’-
या भागात होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन पालिकेचे सहायक आयुक्त मनीष वळंजू व जल विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पाणीगळतीबाबत लक्ष घालून जलवाहिनीची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेश पंड्या यांनी केली आहे.
गळती होणार बंद!
याबाबत प्रभागातील जलखात्याचे सहाय्यक अभियंता राकेश शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाही. मात्र या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून शनिवारपर्यंत ते पूर्ण होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.